Categories: Featured कृषी

कृषी व्यवसायात सक्षमता येणं आता काळाची गरज…

भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपला वसा आणि वारसा जपत शेती क्षेत्रात नवनवीन बदल होताना आपण पाहत आहोत. बऱ्याचशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती व्यवसायात होतो आहे. कृषी व्यवसाय हा फक्त ग्रामीण भागाशी मर्यादित न राहता बऱ्याचशा शहरी ठिकाणीही होतो आहे. एकविसाव्या शतकातही माणसाला शेती व्यवसाय असणे गरजेचे वाटत आहे. काही लोक तर जागे अभावी आपल्या घराच्या टेरेस वरही शेती करताना दिसत आहेत. याचाच अर्थ कृषी व्यवसाय हा आपल्या संस्कृतीचा प्रथम अग्रेसर विषय आहे.

वैज्ञानिक युगातही अनेक शेती संकल्पनांच्या आधारे उत्कृष्ट शेतीचे नमुने पाहावयास मिळतात.ज्या प्रमाणे जंगलात विविध वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. अगदी त्याचप्रमाणे जैविक व सेंद्रिय शेतीवर भर देऊन उत्पन्नात वाढ करता येते. रासायनिक पद्धतीने केलेल्या शेतीमध्ये अनेक कमतरता पहावयास मिळतात. रोगांचा प्रादुर्भाव ही दिसून येतो. म्हणूनच कृषी व्यवसायामध्ये जैविक किंवा सेंद्रिय शेती अधिक फायदेशीर ठरते.

सेंद्रिय शेतीची संकल्पना सांगून अनेक शेतीतज्ञ शेतकऱ्यांना शेतीची संकल्पना अगदी सहज आणि सोपी करून सांगत आहेत. याचबरोबर काहीजण नैसर्गिक शेतीतून देखील शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात हे सप्रमाण सिध्द करून देत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी अशा शेतीतंत्रांचा अवलंब करून चांगली नफ्याची शेती करताना आपल्या आजूबाजूला पहायला मिळत आहेत.

कृषी व्यवसायास अनुसरून अनेक जोडव्यवसाय शेतकरी अगदी सहजरीत्या करू शकतो. त्यामध्ये मग कुक्कुटपालन असेल, गोपालन असेल शेळी पालन असेल, मध संकलनही असेल. याच जोडव्यवसायामुळे पिकासाठी उपयुक्त असलेले जीवामृत तयार करता येते. जीवामृत म्हणजे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन यांचे मिश्रण. अर्थात गोमूत्रामुळे कीड मारली जाते. आणि हे जीवामृत पिकाला खूप लाभदायी ठरते. त्यात कोणत्याही रासायनिक घटकांचा प्रादुर्भाव नसतो. जीवामृत मध्ये तयार झालेले सूक्ष्मजीव जमिनीला ही फायदेशीर ठरतात. तसेच गांडूळ खताचा ही वापर शेतीसाठी चांगलाच फायदेशिर ठरतो.

कृषी व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या त्या भागात नैसर्गिक वा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून उत्पादन घेणं. पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, द्राक्षे, बोर यासारखी पिके घेता येऊ शकतात. ऊसासारख्या पिकांसाठी वाहतुकीचा विषय लक्षात घेऊन व कारखान्याचे अंतर पाहून जास्ती खर्चिक न बनता नफा कसा मिळवता येईल याकडेही लक्ष द्यायला हवे. इतकेच नव्हे तर बारा महिने एकच पीक घेण्यापेक्षा तीन तीन महिन्याच्या फरकाने आंतरपिके घेता येऊ शकतात. मूग, उडीद, भुईमुग, गवार, वांगी यासारख्या तिमाही पिकातूनही नफा मिळवता येतो, आणि जमिनीचा पोतही राखला जातो.

हे सर्व झालं जीवनचक्र सुरळीत चालू असताना. परंतु अनेक वेळा नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो आपत्ती ही येऊ शकते. कोरोना सारख्या महाभयंकर रोगांचा आपण सामना करतच आहोत. संपूर्ण जग ज्या वेळी थांबलेले असेल त्यावेळी मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने डगमगून न जाता प्राप्त परिस्थितीवर मात केली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला सक्षम केलं पाहिजे. सर्व काही ठप्प असताना परिस्थिती ला घाबरून न जाता पर्यायी मार्ग आखायला हवेत. उदाहरण द्यायचे झाले तर चिक्कू, केळी, फणस यासारखी फळे योग्य ती बाजारपेठ मिळत नाही म्हणून वाया न घालवता पर्यायी मार्ग शोधला पाहिजे. चिक्कू, आंबा यासारख्या फळांचे काप करून ते योग्य रित्या वाळवून त्याची पावडर करता येते. चिक्कू शेक, मँगो शेक अशाच पद्धतीने तर असतात. फणस, केळी यापासून वेफर्स करता येतील. शेतीतला माल वाया न जाता वेगळ्या पद्धतीने बाजारात येईल व नफ्यास कारण ठरेल. 

कृषी व्यवसायातील ह्या संकल्पना शेतकरीच अंमलात आणू शकतो. त्यामुळेच कृषी व्यवसायात सक्षमता येणं आता काळाची गरज आहे.
* Vaidehi Padhye – Agri Biotech

Vaidehi Padhye

Share
Published by
Vaidehi Padhye
Tags: Organic Farming