नोकर्या देणारा वांगी बोळ…
कोल्हापुरातल्या महाद्वार रोडला लागून असलेल्या वांगी बोळात गुळवणी यांचा एक जुना वाडा. या वाड्यात जिन्याखाली चिंचोळ्या जागेत एक टेबल खुर्ची. टायपिंगचे मशीन. जागा मिळेल तिथे चिकटवलेल्या नोकरीच्या जाहिराती. त्यात चक्क देवानंदचाही एक फोटो. या नोकरीच्या जाहिराती म्हणजे अनेकांना आशेचा किरण होत्या. पोस्टात क्लार्क… तहसीलदार फौजदार… रेल्वेत टीसी होण्याची संधी… अशा असंख्य जाहिराती तेथे चिकटवलेल्या असायच्या. नोकरीची स्वप्ने पाहणारे अनेक तरुण तरुणी, त्यांचे पालक येथे यायचे. हातात प्लास्टिकची पिशवी यात सर्टिफिकेटची भेंडोळी आणि चेहऱ्यावर नोकरीच्या आशेची एक केविलवाणी किनार दिसायची.
वांगी बोळातले हे एक छोटेसे नोकरी मार्गदर्शन केंद्र दिलीप गुळवणी यांचे. या केंद्रात दिलीप गुळवणी बसलेले असायचे. टायपिंगच्या मशीनचा खडखडाट आणि त्यांच्या तोंडाची बडबड सतत चालू असायची.नोकरी कोठे उपलब्ध आहे, त्याची पात्रता काय, अर्ज करण्याची मुदत किती हे ते पटापट सांगायचे. दहा रुपये घ्यायचे सायकलोस्टाइल चा फॉर्म द्यायचे व तो फॉर्म भरूनही द्यायचे एवढेच नव्हे तर संबंधित कार्यालयात तो फॉर्म पोहोचवण्याची जबाबदारी घ्यायचे. त्याचे वेगळे 10 रुपये आकारायचे. नोकरीचे महत्त्व नोकरी नसलेल्यांनाच कळते. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणी खूप आशेने दिलीप गुळवणीशी संपर्क साधायचे. अनेक जण त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेवर नोकरीत चिकटले पण त्यासाठी पहिल्या टप्प्यात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून देऊन गुळवणींनी त्यांना बळ दिले. ज्यावेळी मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हते त्या काळातले वांगी बोळातले छोटेसे हे नोकरी मार्गदर्शन केंद्र अनेकांना आधार ठरले. अनेकांच्या स्वप्नांना तेथे जिवंत ठेवले गेले. आणि दिलीप गुळवणी हे नाव एका पिढीच्या मनात घर करून राहिले.
हे गुळवणी फावल्या वेळेत कायम रेडिओ ऐकत बसायचे. घरातल्या समारंभात स्पिकरवर देव आनंदची गाणी लावायचे. रात्री वाड्या समोरच्या कट्ट्यावर ट्रांझिस्टर घेऊनच असायचे. कोल्हापुरात किशोर कुमार नाईट हा कार्यकम झाला होता . त्यावेळी झुम झुम झुमरूचे गाणे सुरु होताच ह गुळवणी चक्क स्टेजवर चढून नाचले होते.त्यांची एक खोडही होती. येणार जाणाऱ्यांची ते उगीचच कळ काढायचे. जनसंघ वाल्या समोर काँग्रेस आणि काँग्रेस वाल्या समोर जनसंघाचे कौतुक करायचे. निष्कारण ठराविक लोकांना चिडवत ठेवायचे. नोकरीला लागलेले अनेक जण त्यांना पेढ्याचा बॉक्स घेऊन यायचे. “अरे मला कशाला पेढे देता? ते त्या आईसमोर ठेवा “असे अंबाबाईच्या मंदिराकडे हात करून म्हणायचे . नोकरीसाठी जरा वशिला लावा की ,असे कोण म्हटले तर ” मग मी कशाला येथे फॉर्म विकत बसलो असतो” असे उत्तर दयायचे.
काळाच्या ओघात इंटरनेट आले. नोकरीच्या वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या. ऑनलाइन फॉर्म भरून घेतले जाऊ लागले आणि वांगी बोळातले हे नोकरी मार्गदर्शन केंद्र रिकामे रिकामे जाणवू लागले .पण दिलीप गुळवण्याच्या बडबड्या स्वभावामुळे ते जागते राहिले. काल त्यांचे निधन झाले. आणि त्या काळात इंटरनेट नसताना नेहमी ऑनलाईन असणारे दिलीप गुळवणी आता मात्र कायमचे रेंजच्या बाहेर गेले .कोल्हापुरात अशी वेगवेगळी माणसे होती आणि ती त्यांच्या परीने समाजासाठी धडपडत होती .यापैकी दिलीप गुळवणी यांची नव्या पिढीला ओळख करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…
– सुधाकर काशीद (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून प्रसिध्द वृत्तपत्रसमुहातून सेवानिवृत्त आहेत)