Categories: राजकीय

सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी विरोधकांची मोट बांधावी अशी ज्युनियर पवारांची आजोबांना साद

Lokshahi News Network :
देशात शक्तिशाली सरकार असतानाही ठोस धोरण आखून लोकाभिमुख निर्णय घेतले जात नाहीत. प्रश्न सुटत नसल्याने लोकांचा आक्रोश कायम आहे. त्यामुळे विरोधकांची एकत्रित मोट बांधत सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी एक मोठी ताकद उभी करावी अशी मागणी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले आजोबा शरद पवार यांच्याकडे केली आहे. स्वतःला कार्यकर्ता संबोधत फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. शरद पवारांना उद्देशून ते लिहितात, कधी नव्हे एवढं मोठं आर्थिक संकट आपल्यापुढं उभं ठाकलंय. बेरोजगारी झपाट्याने वाढतेय. युवांना निराशेने ग्रासलंय. कोरोना असतानाही परीक्षा घेऊन मुलांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न होतोय. पालकांना टेन्शन आहे. दोन वेळची चूल कशी पेटवायची असा प्रश्न लाखो कुटुंबांना भेडसावतोय.
भल्याभल्यांना अशक्य वाटणारा आघाडी सरकारचा प्रयोग लोकांच्या हितासाठी आपण राज्यात यशस्वी करुन दाखवला. या धक्क्यातून अनेक नेते अजूनही सावरलेले नाहीत. आपला दांडगा अनुभव पाहता लोकांच्या हिताच्या अनेक गोष्टी आपण अधिकारवाणीने सरकारकडून करून घेऊ शकता, असा सर्वांना विश्वास आहे. असे लिहीत ज्युनियर पवारांनी लोकांच्या भावनिकतेला ही हात घातला आहे.

बिहारच्या निवडणुकीचे वाजलेले बिगुल, राज्यात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने साधला जाणारा निशाणा आदी गोष्टींना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजपाला टार्गेट करण्यासाठी राष्ट्रवादीकडून देशपातळीवरील मुद्द्यांना हायलाईट करण्यात येत आहे. यात बेरोजगारी, स्थलांतरित कामगार, देशासमोरील आर्थिक संकट हे मुद्दे ज्युनियर पवारांकडून पुढे करण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Team Lokshahi News