सांगली। कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूरात शेतकऱ्यांना दिलं. काँम्रेड दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलं. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कारवाई करावी, सागर सदाभाऊ खोत आरोपी असताना पाटण पोलीस स्टेशनमध्ये साक्षीदार कसा झाला, सागर खोतवर देखील कारवाई व्हावी, अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.
सांगलीत कडकनाथ कुक्कुटपालन ही योजना सुरु करण्यात आली होती. ज्य़ामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला पैसा गुंतवावा लागत होता. यामध्ये लागणारं खाद्य हे कंपनी देत असे. कोंबडी आणि अंडी हे कंपनी पैसे देऊन विकत घेणार होती. ज्यामध्ये शेतकऱ्याला वर्षाला अडीच ते तीन लाखापर्यंतचं आमीष दिलं गेलं होतं. सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची अशीच फसवणूक झाली. पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीचे मालक फरार झाले
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानतंर कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. महारयत अॅग्रो कंपनीने जवळपास ८ हजार शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अनेक ठिकाणी या विरोधात तक्रारी आल्या आहेत. पण पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.