Categories: कृषी गुन्हे

कडकनाथ कुकुटपालन घोट्याळ्यातील पिडीत शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यातील हजारो शेतक-यांची करोडो रुपयांची फसवणुक झालेल्या कडकनाथ कुकुटपालन घोटाळ्यातील पिडीत शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिला बळी असून पन्हाळा तालुक्यातील मसूद माले येथील २९ वर्षीय तरूण प्रमोद सर्जेराव जमदाडे याने आत्महत्या केलीय.

प्रमोदने कोंबडी पालनासाठी कर्ज काढले होते. घोटाळ्यामुळे मोठे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड करता येत नव्हती. खासगी सावकार आणि वित्तीय संस्थांच्या तगाद्याला कंटाळून प्रमोद जमदाडे यांनी चार दिवसापूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.

हजारो कुटुंबांना देशोधडीला लावणा-या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याच्या तपासाचे पुढे काय झाले याची कुणालाच कल्पना नसली तरी, या घोटाळ्यामुळे एक शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले आहे. प्रमोद याने कडकनाथ कोंबडी व्यवसायासाठी लाखो रुपये कर्ज व सावकारी कर्ज स्वरूपात काढलेले होते. या व्यवसायात चांगला परतावा मिळेल अशी आशा दाखवून मोठी फसवणूक झाल्याने काढलेले कर्ज कशाने परत करायचे हा मोठा त्याच्या पुढे प्रश्न होता. या आर्थिक धक्क्यातून सावरण्यासाठी त्याने शेळी पालन व्यवसायही सुरू केला होता. मात्र कडकनाथ कोंबडी व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे मोठे हफ्ते परत जाणे अशक्य झाले होते. खासगी सावकार आणि वित्तीय संस्थांच्या तगाद्याला तो कंटाळला होता. त्यामुळे त्याने चार दिवसापूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. गेली ४ दिवस मृत्यूशी झुंज देत आज मंगळवार दि. २१ रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

कडकनाथ घोटाळ्यात अडकलेल्यांना कुणीही वाली नाही

कडकनाथ कोंबडी व्यवसायात हजारो शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये पन्हाळा शाहुवाडी तसेच वारणा परिसरातील बेरोजगार तरुणांची देखील फसवणूक मोठी फसवणुक झाली आहे. कर्जाचे प्रमाण इतके होते की त्यातून सावरणे अनेकांना शक्य झालेले नाही. प्रमोद जमदाडे हा त्यापैकीच एक तरुण आहे.

यासंदर्भात पोलीसात त्याने फसवणूक केलेल्या संबंधित कंपनीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फसवणुक झालेल्या तरुणांनी स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल केलेले गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषन शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्याला राजकीय वरदहस्तामुळे तपासाला पुढे गतीच मिळत नसल्याने फसवणूक झालेले तरूण सैरभैर झाले आहेत. पोलीसाकडून कारवाईच ठोस होत नसल्याने गुंतवणूकदार हतबल झाले आहेत त्यामुळे कडकनाथ आणखी किती बळी घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Lokshahi News