Categories: गुन्हे

कागल मधील तरूणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक

कागल | शहरातील आकाश विनायक सोनुले उर्फ अक्ष्या मॅनर्स याच्या खूनप्रकरणी कागल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. योगेश सोनुले (वय २६ महात्मा फुले वसाहत) व धनंजय उर्फ बंडा सपाटे (वय ३०, रेल्वे लाईन सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा खून समाजातील वर्चस्ववाद आणि जून्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिस निरिक्षक दत्तात्रय नाळे यांनी माहिती दिली आहे. 

महात्मा फुले वसाहततीतील लक्ष्मी मंदिर येथे शुक्रवारी भर दुपारी आकाश विनायक सोनुले उर्फ मॅनर्स याचा खून झाला होता. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी ३४ वार करण्यात आले होते. खून केल्यानंतर मारेकरी योगेश सोनुले व धनंजय उर्फ बंडा सपाटे पसार झाले होते. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच त्यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. 

संशयित आरोपी – योगेश सोनुले

दरम्यान काही दिवसांपूर्वी समाजातील कौटूंबिक वाद आणि मित्रांमधील भांडण मिटवणे यामुळे मयत आकाश आणि योगेश यांच्यात वर्चस्ववाद निर्माण झाला होता. यामुळे या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडणही झाले होते. त्यातूनच तीन दिवसांपूर्वी संशयितांनी आकाशच्या खूनाचा कट रचून त्याचा खून केल्याचे समजते. संशयित योगेश सोनुले याच्यावर सांगली पोलिसात देखील गुन्हे दाखल असून खून आणि महिलेचे अपहरण अशा गुन्ह्यात तो आरोपी आहे. मयत आकाश सोनुले याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 

या खूनप्रकरणाचा तपास अप्पर पोलिस अधिक्षक तिरूपती काकडे, करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलिस करत आहेत. 

Team Lokshahi News