Categories: गुन्हे बातम्या

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या; कराड तालुक्यातील घटनेने खळबळ

सातारा | कोरोनामुळे सगळीकडे ऑनलाईन शिक्षणाला सुरवात झाली आहे. मात्र याच ऑनलाईन शिक्षणामुळे एका मुलीला आपला जीव गमवावा लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कराड तालुक्यातील ओंड येथील शाळकरी विद्यार्थीनीला घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेता न आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ती दहावीत शिक्षण घेत होती. तिच्या वडिलांचा २००७ मध्ये मृत्यू झाला होता. वडिलांचे छत्र हरपल्यापासून ती आई आणि भावासोबत कष्ट करुन उदरनिर्वाह करत होते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.

मात्र ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थिनीकडे मोबाईल नव्हता. मोबाईल नसल्याने अभ्यास कसा करायचा हा प्रश्न तिला सतावत होता. त्यामुळे ती नैराश्यात होती. काल (२९ सप्टेंबर) दुपारी आई कामानिमित्त बाहेर गेल्याच्या दरम्यान या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाईल नसल्याकारणाने दहावीच्या महत्वाच्या टप्प्यावरील अभ्यासाचा तणाव सहन न झाल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: online education Online Exam