Categories: बातम्या महिला सामाजिक

‘कर्तृत्वात भारी, मुली कोल्हापुरी’ उपक्रम मुलींना प्रेरणा देणारा – आ. प्रकाश आबिटकर

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच नवनवे उपक्रम राबविले आहेत. आंतररराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला व बाल कल्याण विभागाने ‘कर्तृत्वात भारी, मुली कोल्हापुरी’  हा उपक्रम मुलींना प्रेरणा देणारा आहे. हा उपक्रम देशभर स्वीकारला जावा अशी अपेक्षा आ. प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. 

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने 11 ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढाओ अंतर्गत ‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ हे घोषवाक्य घेवून फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, मानसिकता बदलून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाज पुढे येईल, त्याचवेळी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बढाओ’ अभियानाचे सार्थक होईल. मुलीच खरा आधार आहेत. खेळ, शिक्षण आणि राजकारण यात जिल्ह्यातील मुली कुठेही मागे नाहीत, हे सिध्द करुन दाखवलय. ‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ अभियानाची निश्चितपणे राज्यपातळीवर दखल घेतली जाईल, असा विश्वासही देसाई यांनी यावेळी बोलून दाखवला.

यावेळी, महिला बाल कल्याण सभापती पद्माराणी पाटील यांनी सांगितले की, महिला व बाल कल्याण विभागामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अंगणवाडी प्रवेश, पोषण माह, मुलींचा जन्मदर वाढविणे यामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. तर समाजकल्याण सभापती स्वाती सासने म्हणाल्या. कोल्हापूरच्या मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून मुलींनी जिल्ह्याचा नावलौकिक सातासमुद्रपार वाढविला आहे. मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशासन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीर राहील. 

कार्यक्रमास आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती स्वाती सासने, महिला व बाल कल्याण समिती सदस्य कल्पना चौगुले, संगीता रेडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

Team Lokshahi News