Categories: राजकीय

करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांनी नाराजीवर दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

कोल्हापूर।१ जानेवारी। ठाकरे सरकारच्या राज्यमंत्रीमंडळ विस्तारात डावललेले करवीरचे आमदार पी एन पाटील यांनी नाराजीबाबत आपले मौन सोडले असून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य मंत्रिमंडळात आ. पी. एन. पाटील यांना स्थान मिळाले नसल्याने नाराज झालेल्या पाटील समर्थकांनी आज (बुधवार) कोल्हापुरात जाहीर मेळावा घेतला. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. याचवेळी आमदार पाटील यांनीही सर्व पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे. 

दरम्यान उद्या (गुरुवार) जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार आहे. या निवडीमध्ये एक एक मताला महत्व आहे. आ. पाटील यांचे चार सदस्यही नाराज आहेत. सद्य: स्थितीत आ. पाटील गट फारच नाराज झाला असल्याने उद्याच्या निवडीमध्ये आता आमदार पाटील यांची भूमिका काय राहणार याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असल्याने आमदार पी.एन.पाटील यांनी आज रात्री कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करूनच आपला पुढील निर्णय जाहीर करू असे सांगितले. त्यामुळे आमदार पाटील आता कोणती भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पी.एन. गटाने दबाव वाढवल्याने राज्यमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही मंत्री कोल्हापूर जिल्हापरिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आणायची यासाठी प्रयत्नशिल आहेत. तर भाजपनेही आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे नाराज पी.एन.पाटील यांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी विद्यमान मंत्र्यांना मोठी कसरत करावी लागणार असून त्यांची नाराजी कशा पध्दतीने दूर केली जाणार यावरच उद्याच्या जिल्हा परिषदेतील अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी ठरणार आहेत. 

Team Lokshahi News