कोल्हापूर | तीन हजार रूपयांची लाच घेताना करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक दादाहरी बांगर आणि होमगार्ड प्रवीण पाटील यास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. दुसऱ्याच्या ताब्यात असलेली मोटार सायकल मिळवून देण्यासाठी ही लाच स्विकारण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिलीय. भोगावती येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस नाईक दादाहरी अभिमन्यू बांगर (रा. पोलिस मुख्यालय कसबा बावडा) हा करवीर पोलिस ठाण्यात काम पाहतो. त्याच्याकडे भोगावती कार्यक्षेत्राची जबाबदारी आहे. तक्रारदाराने आपले वाहन काढून घेतल्याची तक्रार पोलिस पोर्टलवर दिली होती. त्याची चौकशी करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बांगर याच्याकडे होते. ज्यानी ही मोटारसायकल काढून घेतली आहे त्याच्याकडून ती परत मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे बांगर आणि प्रविण पाटील याने तीन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दिली होती.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार रचण्यात आलेल्या सापळ्यात लाच घेताना भोगावती येथे होमगार्ड प्रविण पाटील यास ताब्यात घेण्यात आले. ही लाच बांगर याच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरिक्षक युवराज सरनोबत, कर्मचारी मनोज खोत, शरद पोरे, नवनाथ कदम, मयूर देसाई यांनी सहभाग घेतला.