Categories: सामाजिक

कसबा बीड: ‘यामुळे’ ठेकेदाराकडून नळपाणीपुरवठा योजनेचा ताबा घेऊ नये; ग्रामस्थांची मागणी

करवीर | कसबा बीड गावात कार्यान्वित असणाऱ्या जलस्वराज्य व पेयजल नळपाणीपुरवठा योजनेचा ग्रामपंचायतीने ठेकेदाराकडून ताबा घेऊ नये अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन मुकुंद भगवानराव पाटील यांनी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सत्यजित सुरेशराव पाटील व ग्रामसेवक यांचेकडे सुपुर्द केले आहे.

निवेदनात म्हणटले आहे की, राज्य शासनाची जलस्वराज्य  व पेयजल नळपाणीपुरवठा योजना मंजुरी मिळुन गावात कार्यान्वित झाली आहे. या योजनेबाबत जागरुक नागरिकांनी यातील दोष मांडत ग्रामसभेमधे ही योजना विनादोष व्हावी यासाठी वेळोवेळी सुचना मांडल्या आहेत. आज ही योजना गावास पाणीपुरवठा करत आहे. परंतु नदीवरुन फिल्टर हाऊस व तेथुन अंतर्गत पाईपमधुन घरोघरी नळापर्यंत पिण्याचे पाणी पोहोच होत असताना यामध्ये अनेक ञुटी राहील्या आहेत. त्यामुळेच नागरिकांमध्ये अंसतोष निर्माण झाला आहे. २४ तास पाणी व चौथ्या मजल्यापर्यंत पाणी मिळण्यासाठीची  ही योजना आज ही खोळंबा करत आहे. शासनाने व ग्रामसभा पंचकमिटीने जे नियम, अटी, शर्थी घालुन या  योजनेचे काम कंञाटदाराला दिले त्या कामामध्ये सध्यस्थितीत दोष जाणवत आहेत. दर्जाहीन कामामुळे व योग्य नियोजन नसल्याने ही योजना कसबा बीडच्या ग्रामस्थाना अडचणीची वाटु लागली आहे.

ठेकेदारानी ही योजना पूर्ण १०० टक्के पूर्ण करणे गरजेचे असताना योजनेचे काम ९० टक्के पूर्ण केले आहे. त्यामुळे योजनेचा ताबा ग्रामपंचायतिकडे देण्यापूर्वी राहिलेली कामे पुर्ण करणे जरुरीचे आहे. यासाठी १०० टक्के दोष विरहीत हि योजना विना तक्रार चालेल तेव्हाच ती ग्रामपंचायतिकडे वर्ग करावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. याचा निर्णय हा ग्रामसभेतुनच घ्यावा आणि ठेकेदाराची अंतिम देय रक्कम ही ग्रामसभेच्या मंजुरीनंतरच द्यावी अशी मागणीही याव्दारे करण्यात आली आहे.

सदरचे निवेदन मुकुंद भगवान पाटील यांनी लोकनियुक्त सरपंच सत्यजित पाटील व ग्रामसेवक यांचेकडे सुपुर्द केले आहे. यावेळी उपसरपंच सौ.वैशाली सुर्यवंशी यांचे पति व कॉ नेते दिनकराव सुर्यवंशी, सौ.सुनिता मोरे, पंडित मोरे, कृष्णात काशीद, राजाराम कुंभार, महादेव बिडकर, पांडुरंग सातपुते, महादेव सातपुते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Team Lokshahi News