Categories: कृषी

शेतकरी बंधूनो खरीपाच्या तोंडावर तुमच्या प्रमुख शेतीपिकांसाठी करा ही कामे..

या वर्षीच्या हवामान अंदाज आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार पाऊस काळ खूप चांगला आहे. त्यामुळे शेतकरी बंधूनी खरीपाचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. सदरच्या लेखात आपण खरीपाच्या तोंडावर शेतीची कोण कोणती कामे करावी हे जाणून घेवूया…

ऊस –

सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आडसाली ऊसाची मोठ्या प्रमाणात लागण केली जाते. लागवड करण्यापूर्वी शेताची पूर्ण तयारी करून घ्यावी. शेणखत, कंपोस्टखत किंवा प्रेसमड मातीत मिसळून सरीवरंबा पद्धतीने ऊसाची लागवड करावी. आडसाली ऊस लागवडीसाठी को. ८६०३२ या जातीची निवड करावी. लागण करण्यापूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करून घ्यावी. त्यासाठी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम  बाविस्टीन मिसळून बेणे बुडवून घ्यावे. आडसाली ऊसात मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, चवळी, घेवडा इ. द्वीदल पिके घ्यावीत. तसेच पालक, शेपू, मेथी, वांगी, मिरची, कांदा इ. भाजीपाला पिके घ्यावीत. त्याचा पिकांना चांगला फायदा होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. 

सोयाबीन –

पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा. लागवडी साठी जे एस ३३५, फुले कल्याणी किंवा फुले अग्रणी जातींची निवड करावी. पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो व टोकणीसाठी ४५ किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी ४५ X १० सें.मी. अंतर ठेवावे. हेक्टरी ५० किलो नत्र व ७५ किलो स्फुरद संपुर्ण पेरणीच्यावेळी द्यावे. एक किलो बियाण्यास २.५ ग्रँम कार्बेंडेंझिमची बीज प्रक्रिया करावी. नंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम प्रमाणे रायझोबियम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांची बिजप्रक्रिया करावी.

खरीप ज्वारी –

खरीप ज्वारी पेरणीसाठी शिफारस केलेल्या जातींचाच वापर करावा. यामध्ये संकरीत वाण सी.एस.एच., ५, ९, १३, १४, १६, १७, १८, २३ तसेच सुधारीत वाण एस.पी.व्ही. ४६२, ४७५ व ९४६, सी.एस.व्ही. १३, १५, १७, २० या जातींची निवड करावी. मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यावर ताबडतोब पेरणी करावी पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. बीजप्रक्रियेसाठी अॅझोटोबॅक्टर जीवाणू २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पेरणी वेळी अर्धे नत्र, संपुर्ण स्फुरद व पालाश द्यावे. (नत्र, स्फुरद व पालाश – १००:५०:५० प्रती हेक्टर) पेरणीनंतर एक महिन्याने प्रतीहेक्टर ५०किलो नत्राची मात्रा द्यावी.

भात –

अधिक भात उत्पादनासाठी निरोगी आणि वजनदार भाताचे बियाणे वापरावे. त्यासाठी ३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. पोकळ व रोगाने हलके झालेले, तरंगणारे बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत २४ तास वाळवावे. नंतर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून १ टक्का पारायुक्त औषध उदा. थायरम, मोन्सन १ किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.

गादीवाफ्यावरील भातरोपांच्या उगवणीनंतर ८ – ८ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी २५० मिलीची १०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी करावी. म्हणजे रोपे जोमाने वाढून लवकर लागवडीस येतात. रोपवाटिकेस दररोज झारीने हलके पाणी द्यावे. लावणीनंतर ३० दिवसांपर्यंत शेतातील पाण्याची पातळी २ – ३ सें.मी. इतकी ठेवावी. संकरित भात लागवडीसाठी २५ दिवसांचे रोप वापरावे. २ रोपातील अंतर १५ सें.मी. तसेच २ ओळीतील अंतर १५ ते २० सें. मी. ठेवावे. प्रत्येक चुडात १ किंवा २ जोमदार रोपे लावावीत. खरीप हंगामात जातीपरत्वे लावणीचे अंतर ठेवावे. हळव्या भात जातीची लागवड १५ x १५ सें. मी. प्रमाणे करावी. तसेच निमगरव्या व गरव्या जातींची २० x १५ सें.मी. प्रमाणे लागवड करावी.

कापूस –

बागायती कापूस – लागवडीसाठी सुधारित किंवा संकरीत वाणांची निवड करावी. शक्यतो BT बियाणे निवडावे. संकरीत कापसासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, आणि ५० किलो पालाश तर सुधारित वाणासाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, आणि ४० किलो पालाश द्यावे. २०% नत्र आणि संपूर्ण स्फुरद, पालाश लागवडी वेळी द्यावे. उरलेले नत्र ३० व ६० दिवसांनी विभागून द्यावे. पीक तण विरहित ठेवावे. पाऊस सुरू होई पर्यंत गरजे प्रमाणे पाणी देत राहावे. रसशोषण करणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ई.सी. १० .मि. ली.किंवा इमिडाक्लोप्रिड ३ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मित्र किडींचा वापर करावा. बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापसातील सूर्यफूल, हरभरा, करडई, भुईमूग यासारख्या पिकांची रोपे उपटून टाकावी.

कोरडवाहु कापूस – ओलावा टिकवण्यासाठी कापूस पिकाची लागवड/पेरणी उताराला आडवी समपातळीत करावी. पेरणीसाठी सुधारित किंवा संकरीत वाणाची निवड करावी.

बाजरी –

पावसाची सुरवात होऊन जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांचाच वापर करावा. संकरीत वाणांमध्ये श्रध्दा (आर.एच.आर.बी.एच.८६०९), सबुरी (आर.एच.आर.बी.एच.८९२४), शांती, आदिशक्ती या वाणांची निवड करावी. सुधारीत वाणांमध्ये – डब्ल्यू.सी.सी.७५, आय.सी.टी.पी.८२०३, धनशक्ती या वाणांची निवड करावी. ओलीताची सोय असेल अशा ठिकाणी शक्यतो संकरीत वाण पेरावे. अॅझोटोबॅक्टर जिवाणूची २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी. शिफारशीप्रमाणे ४०:२०:२० ही नत्र-स्फुरद-पालाश खतांची मात्रा द्यावी. बाजरीचे वाणानुसार हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पाणी देणे शक्य असल्यास फुटवे येणाच्या कालावधीत म्हणजे २० ते २५ दिवसांनी एक पाणी द्यावे.

भुईमूग –

भुईमुगाची पेरणी साधारणपणे १५ जून- १५ जुलै या वेळेत करावी. पेरणीसाठी सुधारीत आणि शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. (एस.बी.११, फुले प्रगती, टी.ए.जी.२४ व टी.जी.२६, जे. एल.५०१, फुले भारती (जे.एल.७७६), फुले उन्नती, फुले व्यास, फुले उनप). पेरणीसाठी प्रकारानुसार हेक्टरी १०० ते १२० किलो बियाणे वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास कार्बेंडेंझीम २ ग्रॅम प्रती किलो बिजप्रक्रीया करावी. त्यानंतर बियाण्यावर रायझोबियम व स्फुरद जिवाणूची प्रक्रिया करावी. (२५० ग्रॅम प्रती १०किलोस. रासायनिक खतामध्ये हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद किंवा १०० किलो डायअमोनियम फॉस्फेट संपुर्ण पेरणीच्या वेळी द्यावे + ४०० किलो जिप्सम (अर्धा पेरणीच्यावेळी व अर्धा आऱ्या सुटताना द्यावे)

तूर –

मान्सूनचा पाऊस झाल्यावर वापसा येताच तुरीची पेरणी करावी. पेरणीसाठी बी.डी.एन.१, २, आय.सी.पी.एल.८७११९, आय.सी.पी.एल.८७, बी.एस.एम.आर.८५३, के.टी.८८११, विपूला (टी-९२३०), एन-२९०-२१, फुले राजेश्वरी यासारख्या वाणांची निवड करावी. आय.सी.पी.एल.८७ च्या पेरणीसाठी हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते व इतर जातींसाठी १२-१५ किलो लागते. बियाण्यास भुईमुगाप्रमाणेच बीजप्रक्रिया करावी. हेक्टरी १२५ किलो DAP पेरणीच्या वेळी द्यावे. बाजरी अधिक तूर, सूर्यफूल अधिक तूर आंतरपिके (१:२ प्रमाण) घेणे फायदेशीर आहे. उडीद, मूग, कुळीथ, मटकी, चवळी, वाटाणा यांची जमिनीत पुरेशी ओल आल्याबरोबर पेरणी करावी. पेरणीचेवेळी खताची मात्रा हेक्टरी २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद द्यावे. तसेच प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेंडेंझीम व त्यानंतर स्फुरद व रायझोबियम जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम प्रती १० किलो याप्रमाणे बिजप्रक्रीया करावी. बियाण्याची मात्रा शिफारशीप्रमाणे वापरावी.

सुर्यफुल –

पेरणीसाठी सुधारीत व शिफारस केलेल्या वाणांची निवड करून जमिनीत पुरेशी ओल असल्यावर पेरणी करावी. सुधारित फुले भास्कर, मॉर्डन, एस.एस.५६, भानू तसेच संकरीत जातींमध्ये फुले रविराज, के.बी.एस.एच.४४ या वाणाची निवड कारावी. पेरणीसाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी मध्यम जमिनीत ४५ X ३० सें.मी. व भारी जमिनीत ६० X ३० सें.मी. अंतर ठेवावे . पेरणीपुर्वी १ किलो बियाण्यास ५ ग्रॅम मेटॅलॅक्झील (३५ टक्के अॅप्रॉन) बिजप्रक्रिया करावी. शेवटी प्रतिकिलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद जिवाणूंची प्रक्रिया करावी. बागायती पिकासाठी पेरणीच्यावेळी हेक्टरी ३० किलो नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश तर पेरणीनंतर एक महिन्याने ३० किलो नत्र द्यावे.

फळपिकांसाठी हे महत्वाचे –

फळपिकांची काढणी झाल्यानंतर पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर काढावेत. रोगग्रस्त, कीडग्रस्त फांद्या कापून छाटून टाकाव्यात. जमिनीची नांगरट करावी त्यामुळे रोग व किडीच्या सुप्तावस्था प्रखर सूर्यप्रकाशात येवून मरून जातात.. आंबा, चिक्कू, पेरू, डाळींब, नारळ तसेच कोरडवाहू फळपिकांची नवीन लागवड शिफारस केलेल्या अंतरावर पाऊस सूरू होताच करावी.

  • सौजन्य होय आम्ही शेतकरी समूह
Team Lokshahi News