Categories: Featured राजकीय

‘मोदींची तुलना हा शिवरायांचाच सन्मान’, कोल्हापूरात भाजप नेत्याची मुक्ताफळे!

कोल्हापूर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना आधुनिक काळातील शिवाजी महाराज अशी करणे गैर नसल्याची मुक्ताफळे भाजपचे पराभूत आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोल्हापूरात उधळली आहेत. सुरेश हाळवणकर यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांमुळे शिवप्रेमींमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. 

भाजपच्या शहर व जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आयोजित कार्यक्रमात हाळवणकरांनी ही मुक्ताफळे उधळली असून विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुक्ताफळे उधळताना हाळवणकर पुढे म्हणाले की, साडेतीनशे वर्षानंतर शिवाजी महाराजांसारखी युध्दनित, महाराजांसारखा जाणता राजा, सामान्य शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची वृत्ती मोदींच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. जर देशातील एखादा शेतकरी अडचणीत आला तर मोदी यांनी त्याला शेतकरी सन्मान निधी योजनेतून वर्षाला ६ हजार रूपये देण्याची सोय केली आहे, मोदींच्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. ही कल्पना दुसऱ्या कुणालाही सुचली नसती. तसेच एखादा गरीब आजारी असेल तर त्याला आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाख रूपयापर्यंतची वैद्यकीय मदत मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही दवाखान्यात अशा व्यक्तीना उपचार करता येतात. 

दरम्यान सुरेश हाळवणकरांनी उधळलेली ही मुक्ताफळे म्हणजे भाजपच्या नेत्यांनी खरोखरच अक्कल गहाण टाकलीय का, असा प्रश्न निर्माण करणारी असल्याचे मत आता सोशल मिडीयावर व्यक्त केले जाऊ लागले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: ‘आयुष्यमान भारत’ योजना PM kisan samman yojana PM किसान सन्मान निधी योजना आज के शिवाजी नरेंद्र मोदी चंद्रकांतदादा पाटील धनंजय महाडिक नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान सन्मान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप सुरेश हाळवणकर