Categories: बातम्या सामाजिक

कोल्हापूर : दोन्ही हुतात्मा वीर पुत्राना प्रत्येकी १ कोटी देणार – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर | पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या संग्राम पाटील यांच्यावर आज त्यांच्या गावी (निगवे खालसा) अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान संग्राम पाटील अमर रहे, वीर जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत उपस्थितांनी संग्राम पाटील यांना अखेरची मानवंदना दिली. संग्राम यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील दोन्ही शहीद जवानांना प्रत्येकी १ कोटीची मदत जाहीर केली.

संग्राम पाटील यांनी दोन वर्षे सेवा वाढवून घेत देशासाठी योगदान दिले. याचदरम्यान त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान मनाला चटका लावणारे असले तरी ते देशातील तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. संग्राम पाटील यांच्या बलिदानामुळे त्यांच्या कुटूंबियावर दुखाचा डोंगर कोसळला असून राज्य शासन शहीद जवानाच्या कुटूंबियांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील असा विश्वास सतेज पाटील यांनी शहीद कुटूंबियांना दिला.

मागील आठवड्यात ऐन भाऊबिजेच्या दिवशी आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील सुपुत्र ऋषिकेश जोंधळे हे देखील पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले होते. या दोन्ही शहीदांच्या कुटूंबियांना १ कोटी रूपयांची मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने दिले आहे.

Team Lokshahi News