Categories: गुन्हे बातम्या

कोल्हापूर : कारवाई सुरू होती विना मास्क फिरणाऱ्यांवर.. मात्र सापडला दोन किलो गांजा!

कोल्हापूर | कोल्हापूर शहर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कोल्हापूरात दोन किलो गांजा पकडण्यात आला आहे. पोलिसांनी एका मोटारीचा पाठलाग ही कारवाई केली आहे. या प्रकरणी तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली असून गांजासह मोटार, तीन मोबाईल संच असा एकूण चार लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोटार चालक सूरज विजय गोडसे (वय २५, रा. येडेमच्छिंद्र, वाळवा), रितेश राकेश सूर्यगंध (२१, रा. ओझर्डे, वाळवा) आणि रोहित लक्ष्मण भोसले (२४, रा. रेठरेहरणाक्ष) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राथमिक तपासात गांजाचे कनेक्‍शन इस्लामपूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शहर परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर महापालिका व पोलिस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील कॉन्स्टेबल गुलाब मुल्लाणी कर्तव्य बजावत असताना गोखले महाविद्यालय चौकातून सायंकाळी काळी आलिशान मोटार सावित्रीबाई फुले रुग्णालय सिग्नलकडे जाताना दिसली. मुल्लाणी यांना या मोटारीचा संशय आल्याने त्यांनी मोटार सिग्नलला थांबविली. परंतु गाडी बाजूला घेण्याचे नाटक करत चालकाने भरधाव वेगाने पळवली. सिग्नलला थांबलेल्या मोटारसायकल वाल्याच्या मदतीने मुल्लाणी यांनी मोटारीचा पाठलाग केला. अखेर भवानी मंडप येथे ही मोटार ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रीतम मिठारी, गजानन परिट व रूपेश कुंभार यांनीही या कारवाईत भाग घेत मुल्लाणी यांच्या सोबत या मोटारीचा पाठलाग करून ती ताब्यात घेतली.

मोटारचालकासह आतील दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात गाडीची झडती घेतली. यावेळी एका पिशवीत पोलिसांना गांजाच्या पुड्या मिळून आल्या. याची माहिती जुना राजवाडा पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना देण्यात आली. चौकशीत मोटार चालकाने आपले नाव रोहित गोडसे, तर अन्य दोघांनी रोहित भोसले व रितेश सूर्यगंध असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून कोल्हापूर शहरात आणलेला हा गांजा कोठून आणला आणि कोठे नेला जात होता, तसेच यामागे एखादे रॅकेट आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: cannabis