कोल्हापूर | गृह अलगीकरण विलगीकरणातील व्यक्ती हमीपत्रातील अटींचे उल्लंघन करुन बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा व्यक्तींवर पाच हजारांच्या दंडासोबतच कुटुंबातील सर्व व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रशासनास दिले आहेत.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची घरीच राहण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध असल्यास हमीपत्र घेवून घरातच विलगीकरण व अलगीकरण करण्यात येत आहे. मात्र हमीपत्रातील अटींचे उल्लंघन करीत या व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत.
या बाधित व्यक्तींमुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, महाराष्ट्र नुसार कारवाई केली जाईल. अटींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर ५ हजार दंडात्मक कारवाई सोबतच कुटुंबातील सर्व व्यक्तींवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.