कोल्हापूर | जिल्ह्यात व्हेंटीलेटर अभावी रूग्णांचा जीव जात असताना, शिवाजी विद्यापीठीतील कोविड केअर सेंटर मध्ये मात्र गेल्या तीन महिन्यापासून व्हेंटीलेटर धूळ खात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य प्रशासनाचा या भोंगळ कारभाराची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोलखोल केली असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. अशातच शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विभागातील कोविड केअर सेंटर मध्ये जुलै महिन्यात प्रशासनाकडून दोन व्हेंटीलेटर देण्यात आलेत. पण आरोग्य विभागाने या दोन्ही वेंटीलेटरची जोडणीच केलेली नाही. ही बाब संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी थेट सेंटरवर धडक मारत ड्युटीवरील मेडिकल स्टाफला याबाबत जाब विचारला. उपस्थित स्टाफने वरिष्ठांकडे विचारणा करण्यास सांगितले. यानंतर वरिष्ठ डॉक्टर पावरा यांनीही, आपल्या वरिष्ठांना विचारा असे सांगत हात वर केले. घडलेला प्रकार संतापजनक असल्याने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांना फोन करून हे व्हेंटिलेटर तीन महिन्यांपासून का पडून आहेत? अशी विचारणा केली. यावर आयुक्तांनी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीला रुग्णालयाचा दर्जा नसल्याचे कारण देत व्हेंटिलेटर वापरता येत नसल्याचे सांगितले.
परवानगीच नाही तर व्हेंटिलेटर दिले का?
कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांत शेकडो गोरगरीब रुग्णांचे ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे प्राण गेले आहेत. खाजगी रुग्णालयात सावकारी बोकाळली असून ५ दिवसांच्या व्हेंटिलेटरसाठी दोन ते अडीच लाख मोजावे लागत असल्याच्या अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. सध्या एका व्हेंटिलेटरवर १० बेडचे आयसीयू चालवले जाते. अशातच विद्यापीठातील २ व्हेंटीलेटर वापराविना पडून आहेत. शिवाजी विद्यापिठात कोविड केअर सेंटर (सीसीसी) असल्यामुळे व्हेंटिलेटर वापरता येत नसल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. असे असेल तर मग कोविड केअरसेंटरला ३ महिन्यांपूर्वी व्हेंटिलेटर दिलेच का? इतक्या दिवसात ते व्हेंटिलेटर इतर ठिकाणी हलविणे आरोग्य प्रशासनास आवश्यक वाटले नाही का? जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता असताना वापराविना पडून असलेले व्हेंटिलेटर गोरगरीब गरजूंचे प्राण वाचविण्याच्या कामी आले नसते का? यात कोणत्या आर्थिक भ्रष्टाचाराची पाळेमुळे दडली आहेत का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने संभाजी ब्रिगेडच्या रुपेश पाटील यांनी उपस्थित केले आहेत.