Categories: आरोग्य सामाजिक

धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबर मृत्युंची संख्याही वाढली

कोल्हापूर | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकच भर पडत असून आज सकाळी १० वाजेपर्यंत २२ नव्या रूग्णांची भर पडली आहे. नवीन रूग्णांची संख्या वाढत असतानाच मृत्यु झालेल्यांची संख्याही वाढत आहे. काल सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील मृत्युंची संख्या २६ होती, ती आज सकाळी १० वाजेपर्यंत थेट ३२ वर गेली आहे. इतक्या कमी कालावधीत ६ जणांचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, यामुळे येत्या काळात प्रशासनाची चांगलीच कसोटी लागणार आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाण आणि वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

आज सकाळी १० वाजेपर्यंत ४९२ अहवाल प्राप्त झाले असून यातील ४२४ निगेटिव्ह आहेत. तर २२ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यातील ४५ अहवाल प्रलंबित आहेत. (एकाचा दुसरा अहवालही पॉझीटिव्ह आहे.) जिल्ह्यात आजअखेर एकूण १३३१ पॉझीटिव्हपैकी ८५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजअखेर जिल्ह्यात एकूण ४४० कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिलीय.

आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त २२ पॉझीटिव्ह अहवालापैकी हातकणंगले – ३, करवीर – २, नगरपालिका क्षेत्र – ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४ व इतर जिल्हा व राज्य – २ असा समावेश आहे.

Team Lokshahi News