गगनबावडा। तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा आणखी एक रूग्ण आढळल्याने तालुक्याची चिंता वाढली आहे. तळये-लखमापूर येथील २५ वर्षीय तरूण १६ मे रोजी मुंबईहून खाजगी वाहनाने सीपीआर येथे स्वॅब देऊन गावी आला होता. परंतु त्याला गावात प्रवेश न देता ग्रामस्थानी प्रशासकीय यंत्रणेला कळवून त्याची रवानगी गगनबावडा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये केली होती.
काल उशिरा रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून हा रूग्ण प्रशासन आणि आरोग्ययंत्रणेच्या देखरेखीखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या तरूणाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचेही स्वॅब घेतले असून अद्याप रिपोर्ट प्राप्त झालेले नाहीत.
गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथे आढऴलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या रूपाने तालुक्यात कोरोनाचा प्रवेश झाला आहे. सध्या ही महिला सीपीआर येथील कोरोना कक्षात उपचार घेत आहे. या दोन्ही रूग्णांची प्रवास हिस्ट्री मुंबईचीच असल्याने मुंबईवरून येणाऱ्या प्रवासी नागरिकांच्याबाबतीत प्रशासनाकडून अधिक दक्षता घेतली जात आहे. तसेच आपल्या आसपास कुणी असे नागरिक विनापरवाना अथवा कुणालाही न कळवता आलेले आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी स्वतःहून प्रशासनास कळवणे गरजेचे आहे.
आज सकाळी १० वाजता ३४६ प्राप्त अहवालापैकी ३ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण १८२ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.