Categories: आरोग्य

कोल्हापूरात एकाच वेळी कोरोनाचे ७ नवे रूग्ण, जिल्ह्यात खळबळ

कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून एकाच वेळी ७ नव्या रूग्णाची भर पडली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३७ झाली आहे. सध्या मुंबई पुणे याठिकाणावरून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात नव्याने ७ रूग्णांची एकाचवेळी भर पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनावरील ताण वाढला आहे.

जिल्ह्यात सापडलेले रूग्ण हे राधानगरी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील २ तर कागल तालुक्यातील १ जण आहे. यापैकी ५ जण मुंबईतून आले आहेत. तर दोघेजण सोलापूर जिल्ह्यातून आल्याची माहिती आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे  २ रूग्ण आढळले होते. शाहुवाडी तालुक्यातील पणुंद्रे तर्फ जांभळेवाडी येथील तरूणाचा यात समावेश होता. तसेच जयसिंगपूर, संभाजीपूर येथील तरूण पॉझिटिव्ह आढळले होते. जांभळेवाडीचा तरूण पालघर जिल्ह्यातून आला होता. तर सोलापूर मधून आलेल्या जयसिंगपूर परिसरातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला इचलकरंजीच्या आयजीएम मधून सीपीआरला अॅडमिट करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. या तरूणासोबत १३ जण सोलापूरला जमातीच्या कार्यक्रमासाठी गेल्याची माहिती आहे. 

Team Lokshahi News