कोल्हापूर | तरूणांनो कोल्हापूर विमानतळावर नोकरीची संधी… वाचून खूश झालात ना… पण थांबा, कारण ही बातमी खोटी आहे. सध्या व्हॉटस् अप आणि ई- मेलच्या माध्यमातून तरूणांना फसवणारी टोळी कार्यरत झाली असून विमानतळावरील नोकरीचे आमिष दाखवले जात आहे. तुम्हाला विमानतळावर तिकिट बुकिंग, प्रवाशांशी संवाद साधण्याची नोकरी मिळणार आहे अशा आशयाचे संदेश पाठवले जात आहेत. यासाठी तुम्हाला ४५ दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणासाठी व्हॉट्सऍपवर माहिती आणि कागदपत्रे पाठवावीत, दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी १५०० रुपयेही बॅंक खात्यावर भरावेत असेही यात नमुद केले असून यामाध्यमातून बेरोजगारांची आर्थिक लूट केली जात आहे. जिल्ह्यातील हजारो तरुणांना हा संदेश जात आहेत.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्याचाच गैरफायदा घेत तरुणांना ई-मेल व संदेशाच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. यामध्ये, संबंधितांना विमान कंपनीच्या व्यवस्थापनाकडून तुमची निवड झाल्याचा ई-मेल पाठवला जाईल. विमानसेवेसाठी तुमची ग्राऊंड हॅंडलिंग सीएसए पोस्टसाठी निवड होईल किंवा तुम्हाला तिकीट विभागात काम मिळेल. तुम्हाला ग्राहकांसाठी तिकिटे बुक करावी लागतील. प्रवाशांशी सुसंवाद साधावा लागेल, असेही सांगितले जात आहे. विमानतळावर काम करण्याचा तुमचा अनुभव नाही. या क्षेत्रात नवीन आहात यासाठी ४५ दिवसांचे प्रशिक्षणही घ्यावे लागेल असे सांगितले जात आहे.
प्रशिक्षण घेऊन तुमची निवड झाल्यास सध्याच्या पगारामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होईल. सध्या तुम्ही कोणत्या एअरलाईन्स कंपनीची निवड केली आहे, याची अद्याप माहिती नाही. त्यामुळे, तुमच्याकडून कागदपत्रे मागितली जात आहेत. त्यांची पडताळणीही केली जाणार आहे. प्रत्येकाला आयडी कार्ड, प्रमाणपत्रे आणि गुणपत्रके याच्या पडताळणीसाठी १५०० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. कंपनीकडून ही सर्व कागदपत्रे पडताळणी केली जातील. त्यानंतर कागदपत्रे खरी असल्यास विमानतळावर नोकरीसाठी तुमची निवड केली जाईल. असे सांगून पैसे आणि कागदपत्रांची कलर फोटो कॉपी घेतली जात आहे.
याबाबत विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी… विमानतळाकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मागितलेली नाहीत. बोगस लिंक तयार करून लोकांची लुबाडणूक करणारे सक्रिय झाले आहेत. अशा लिंकवर विश्वास ठेवू नका. विमानतळात नोकरीसाठी, कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्या प्रकारचे पैसे घेतले जात नाही. जी लिंक फिरत आहे ती खोटी आहे. तरुणांनी अशा लिंकपासून सावध राहावे. – कमलकुमार कटारिया, विमानतळ संचालक, कोल्हापूर