कोल्हापूर | कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजारसमितीत शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले आहेत. कांद्याच्या दरात १००० ते १५०० रूपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारसमितीच्या कार्यालयाजवळ गोळा होत आपला संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात चांगली वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. परंतु आज बाजार सुरू होताच कांद्याच्या दरात मागील दराच्या तुलनेत प्रतिकिलो १० ते १५ रूपयांची घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. अचानक व्यापाऱ्यांच्या मनमानीपणामुळे दर कोसळवण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडत बाजारसमितीच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला.
दरम्यान, कांदा व्यापाऱ्यांच्या मते राज्यातील बहुतांशी बाजारसमिती मध्ये कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. अचानक आवकेचे प्रमाण वाढल्याने दर घसरल्याचे कारण व्यापाऱ्यांनी दिले असले तरी सरासरीच्या प्रमाणातच बाजारसमितीत कांद्याची आवक असल्याचे दिसून आले. कोल्हापूर बाजारसमितीत दररोज ५० ते ५५ गाडी कांद्याची आवक असते, तीच आवक आजही आहे. तर कालचे कांद्याचे दर ४२०० ते ४५०० रूपये प्रति क्विंटल होते, तेच आज ३२०० ते ३५०० रूपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
एकीकडे कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत बाजारपेठेत देखील कांद्याचे दर पाडले जात असून शेतकऱ्यांना नाडण्याचे काम केले जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.