कोल्हापूर। जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तिनेच आईबापाच्य़ा विरोधात पळून जाऊन लग्न केले अथवा प्रियकरासोबत पसार झाली तर… अशावेळी अशा मुलीच्या आईबापांना वाटणारे दुखः त्यांचे त्यानांच माहित.
कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली असून पळून गेलेल्या मुलीचे तिच्या बापानेच आत्मक्लेश म्हणून सर्वत्र पोस्टर लावलेत. जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या एका खेडेगावातील ही घटना असल्याचे समोर येत असून या पोस्टरवर मुलीच्या बापाने…” बाळ तु जन्माला येतानाच संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस. त्या वेदना सहन करीत ज्या आईने तुझे सर्व हट्ट, लाड पुरवीत मोठे केले ती दुर्दैवी आई…. आजअखेर तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला… परंतु या पुढील तुझ्या आयुष्यात आनंद, सुख देण्यास असमर्थ ठरला.. म्हणून तू सोडून गेलीस… हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा हा कमनशिबी बाप…” असा संदेश छापला आहे.
त्याचबरोबर पोस्टरवर बोध म्हणून… हे वाचून अशा वागणाऱ्या मुलींच्या मनाचे परिवर्तन होऊऩ आपल्या आईवड़िलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा असाही मजकूर छापला आहे. पोस्टरवर मुलीला श्रध्दांजलीही वाहिली असून तिच्या नावापुढे कैलासवासी असे लिहिले आहे. मुलीचे नाव आणि फोटोसहित लावलेल्या या पोस्टरमुळे सध्या सगळीकडे खळबळ उडाली असून सोशल मिडीयावर हे पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे.