Categories: अर्थ/उद्योग कृषी

गोकुळात ‘कोण’ नांदणार? नाट्यमय घडामोडींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण तापले

कोल्हापूर। जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे ठराव जमा करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना गोकुळच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडू लागल्या आहेत. यामुळे सत्ताधारी महाडिक गटाला यावेळी गोकुळवरील सत्ता अबाधित राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेनंतर आमचं ठरलंय, आता फक्त गोकुळ उरलंय, अस म्हणत महाडिक गटाचे कट्टर विरोधक असणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत गोकुळ काबीज करण्यासाठी चंग बांधला आहे. यात त्यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांचीही साथ मिळणार हे उघड आहे. त्यातच सत्ताधारी गटातील सदस्यांनीच स्वतंत्रपणे ठराव जमा केल्याने यावेळी तरी मंत्री सतेज पाटील गोकुळमध्ये शिरकाव करण्यात यशस्वी ठरणार का याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सत्ताधारी महादेवराव महाडिक आणि काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाने आज सोमवारी (२० जानेवारी) सहाय्यक दुग्ध निबंधकांकडे एकत्रितपणे ठराव जमा करत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला सत्ताधारी गटातीलच सदस्यांनी खिंडार पाडलं आहे. ठराव जमा करण्यासाठी सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली असल्याचे दिसत आहे.

आज (२० जानेवारी) संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि शशिकांत पाटील यांनी आपल्या गटाचा स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने गोकुळच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींचे दर्शन घडवले. आपल्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत या तिघांनी बंडाचा झेंडा हाती घेण्याचे संकेत दिलेत. असे असले तरी आमदार पी.एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ठराव एकत्र जमा करून घेतले असून, बंड पुकारलेल्या संचालकांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करू असा विश्वास माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या पी एन पाटील यांनी पुन्हा एकदा गोकुळच्या सत्ताधारी गटासोबत जात सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला असला तरी गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांचीही भेट घेणार असल्याचं पी. एन. पाटील यांनी म्हणटलं असून गोकुळच्या राजकारणाला नवे वळण देण्याचे संकेत दिले आहेत. 

Team Lokshahi News