Categories: आरोग्य

कोल्हापूरातील ‘त्या’ रूग्णाचा मृत्यु कोरोनाने नाही; वाचा काय आहे मृत्युचे ‘खरे’ कारण

कोल्हापूर। कोल्हापुरात कोरोना सदृश्य संशयिताचा मृत्यु झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. काल सायंकाळी सीपीआरमध्ये कोरोना कक्षात या रूग्णाचा मृत्यु झाला होता. सदर रूग्णाचे नाव विरेंद्रसिंह यादव (वय ६८, रा. नागाव फाटा) असून त्याचा मृत्यू जुन्या फुफूसाच्या विकारामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी आज दिलीय. त्यामुळे हा कोरोनाचा बळी नसल्याचे स्पष्ट झाल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. 

त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, मृत यादव हे रविवार दि. १५ मार्चरोजी पहाटे ४ वा. ते श्वसनाचा त्रास असल्यामुळे गंभीर अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल झाले होते. दि. ८ मार्च ते १२ मार्च या कालावधित हरियाणा, दिल्ली, पुणे, कोल्हापूर असा प्रवास केला होता. या रुग्णास पूर्वीपासून असलेल्या जुन्या फुफुसाच्या आजाराचा  कोल्हापुरात आल्यानंतर जास्त त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल झाले होते.

या रुग्णाचा प्रवास हा हरियाणा, दिल्ली, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणचा असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेवून पुणे येथील एन आय व्ही संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सीपीआरमध्ये व्हेंटीलेटरच्या सहाय्याने उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रविवारी १५ मार्चरोजी सायंकाळी ५ वा त्यांचा मृत्यू झाला. मृत विरेंद्रसिंह यादव हे कोरोना संशयित रुग्ण या व्याखेत बसत नसल्यामुळे त्यांच्या स्वॅब नमुन्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही, असे पुण्यातील एन आय व्ही संस्थेने कळविले आहे.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नयेत, तसेच सोशल मिडीयावर येणारे कोरोनासंबंधित मेसेज खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नयेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

Team Lokshahi News