Categories: आरोग्य सामाजिक

Kolhapur : कोरोना उपचारासाठी ज्यादा बील आकारलं जातयं? थेट ‘या’ नंबरवर करा तक्रार!

कोल्हापूर | शासनाने कोरोना उपचारासाठी दवाखान्यांना दर ठरवून दिले आहेत. तरीही काही खाजगी दवाखान्यांकडून कोरोनाग्रस्तांच्या असहाय्यतेचा फायदा घेत भरमसाठ बील उकळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. लेखाधिकार्‍यांनी केलेल्या बिल तपासणीनंतर ही बाब उघडकीस आली आहे. यामुळे गेल्या महिनाभरात कोरोनाग्रस्तांचे तब्बल ८७ लाख रूपये वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. 

  • रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन –
    • जिल्हाधिकारी व आयुक्तांनी बिलांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक बिल लेखाधिकाऱ्यांनी तपासल्यानंतरच ते भरून घेण्याच्या सूचना हॉस्पिटल व्यवस्थापनाला दिल्या आहेत. यापुढेही हॉस्पिटल व्यवस्थापनाने लेखाधिकारी यांच्याकडून बिले तपासून न घेता रूग्णाला बिल भरण्याचा तगादा लावला तर महापालिकेच्या वॉर रूम फोन. क्र. 02312542601 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांनी केले आहे.

सध्या कोल्हापूर शहरातील ५० हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी परवानगी आहे. याचा गैरफायदा घेत काही हॉस्पिटलकडून कोरोनाग्रस्तांची बिलातून आर्थिक लूट सुरू असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हॉस्पिटलमधील बिलांची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २५ लेखाधिकारी (ऑडिटर) नियुक्त केले होते. कोरोनासंदर्भातील बिलांची या लेखाधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच बिलाची रक्कम भरून घेण्याचे आदेश संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाला दिले आहेत.

१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत लेखाधिकार्‍यांनी १२ कोटी ८० लाख इतक्या रकमेच्या १६०१ बिलांची तपासणी केली. यापैकी ३०० हून अधिक बिलात काही हॉस्पिटलकडून जादा रक्कमेची आकारणी केल्याचे स्पष्ट झाले. याची रक्कम तब्बल ८७ लाख इतकी आहे. कोरोना रुग्णांचे बिल तपासल्यानंतर काही खासगी हॉस्पिटलकडून अक्षरश: रुग्णांची लूट सुरू असल्याचे या लेखाधिकार्‍यांनी सांगितले. परंतु बिलांच्या तपासणीमुळे त्याला चाप बसत आहे. कोल्हापूर शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलवरील बिलांच्या नियंत्रणासाठी महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांची नियुक्ती केली आहे.

Team Lokshahi News