Categories: आरोग्य प्रशासकीय सामाजिक

कोल्हापूर : हॉटेल व्यावसायिकांनो इकडे लक्ष द्या; अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा..!

कोल्हापूर | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने कडक धोरण राबवण्यास सुरवात केलीय. या अनुषंगाने जिल्ह्यातील ज्या हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहांमध्ये बाहेरील ग्राहकांना बसून खाद्यपदार्थ खाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे, अशा आस्थापनांची नियमित तपासणी करुन त्यांच्यावर महानगरपालिका आयुक्त, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद/ नगरपंचायत, सर्व प्रभाग समिती/ग्राम समिती यांना पाठविलेल्या पत्रात असे नमुद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या दिनांक ३१ ऑगस्ट रोजीच्या आदेशानुसार हॉटेल्स/लॉजेस (निवास व्यवस्थेची) १०० टक्के क्षमतेसह सुरु राहतील असे नमुद केले आहे. फुडकोर्टस, रेस्टॉरंटस यांना फक्त पार्सल सुविधा देता येईल असे निर्देशित करण्यात आले होते. असे असताना जिल्ह्यातील काही रेस्टॉरंटस, खाद्यगृहांमध्ये बाहेरील ग्राहकांना बसून खाद्यपदार्थ खाण्यासाठी परवानगी देत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका आयुक्त व मुख्याधिकारी नगरपालिका व ग्रामीण भागांमध्ये गटविकास अधिकारी/तहसिलदार यांनी त्वरीत कारवाई सुरू करावी. त्याच प्रमाणे प्रभाग/ग्राम समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असे उल्लंघन त्वरीत संबंधित पोलीस अधिकारी यांच्या निदर्शनास आणावे. त्याचप्रमाणे पोलीस विभागामार्फतही महामार्ग, नागरी व ग्रामीण भागातील उल्लंघनाची तपासणी करून संबंधीत आस्थापनां विरुध्द भारतीय दंड सहीता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुरी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येवून दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. 

Team Lokshahi News