Categories: गुन्हे बातम्या

इचलकरंजी : थंड चहानं डोस्कं गरम, गरम डोस्क्यानं चाकू हल्ला..

कोल्हापूर | कुणाचं डोकं कशानं गरम होईल याचा काही नेम नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात अशीच घटना घडली असून थंड चहा दिल्याच्या रागानं डोकं गरम झालेल्या माथेफिरूनी थेट हॉटेल व्यावसायिक चहाविक्रेत्यावर चाकू हल्ला केला. याप्रकरणी पाच जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे.  

याबाबत मिळालेली माहिती अशी, महम्मद इकबाल कुरेशी याचे नदीवेस नाका परिसरात नूर नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी संशयित ५ जण गुरूवारी सायंकाळी चहा पिण्यास आले होते. यावेळी थंड चहा दिल्याच्या रागातून महम्मद कुरेशीसोबत त्यांचा वाद झाला. वादातून नागेश पुजारी या संशयिताने कमरेचा चाकू काढून कुरेशीला दोन ठिकाणी भोसकले. त्याचबरोबर सर्वांनी मिळून हॉटेलची मोडतोडही केली. 

याप्रकरणी, सलमान नदाफ, नागेश पुजारी, सौरभ ढाले, संकेत नाकर्डे, गौरव कारंडे (रा. इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी गौरव कारंडे वगळता चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत. 

Team Lokshahi News