कोल्हापूर | जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होत आहे. ती पुन्हा वाढणार नाही यासाठी नागरिकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर यांचा वापर करून नवरात्रोत्सव आणि दसरा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये मार्चपासून लॉकडाऊन सुरू होता. त्यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अनलॉक सुरू आहे, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, या अनलॉकमुळे नागरिकांचे व्यवहार सुरू झाले आहेत. सद्या २०० ते ३०० बाधित रूग्ण सापडत आहेत. २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. १७ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे.
नागरिकांनी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी सामाजिक अंतराचा वापर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि गर्दी टाळून हे उत्सव साधेपणाने साजरे करावेत.