Categories: कृषी गुन्हे बातम्या

कोल्हापूर : कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणी यवलूज येथून एकास अटक

कोल्हापूर | कोल्हापूरसह महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी व्हिजन ॲग्रो कंपनीविरोधात गुन्हा नोंद झाला असून यातील संचालक सुशील पाटील (रा.यवलूूज) याला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेस यश आले आहे. बुधवारी रात्री पाटील यास अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

कोल्हापूरसह महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची व्हिजन ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून प्रवर्तक विकास खुडे, विद्या खुडे यांनी कोट्यवधीची फसवणूक केली. त्यानंतर कार्यालय बंद करून सहाजण फरार झाले होते. तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या पथकाने गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी विकास खुडे याच्या पोर्ले (ता. पन्हाळा) येथील घराची झडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे, किंमती घड्याळ, पल्सर मोटारसायकल, आदी साहित्य जप्त केले.

कंपनीच्या इतर संचालकांच्याही घरांची झडतीही गुन्हे शाखेने केली. यावेळी संचालक सुशील पाटीलच्या घराची झडती सुरू असताना संशयित पाटील हा घराच्या पोटमाळ्यावर अंधारात लपून बसल्याचे आढळले. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. यावेळी पाटीलकडे कसून चौकशी केल्यानंतर महत्वाची कागदपत्रे आणि लॅपटॉप आढळून आला. संशयित खुडे दांपत्यासह इतर फरार आरोपींचा शोध आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.  

Team Lokshahi News