Categories: Featured

कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन

कोल्हापूर | जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोमवारपासून कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून ७ दिवसांसाठी हा लॉकडाऊन पाळला जाणार असून याकाळात केवळ दूध आणि औषधे इतक्याच सेवा उपलब्ध होणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ आज बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.

सुरूवातीला जिल्हाधिकारी देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यामध्ये खाटांची उपलब्धता, दुसऱ्या टप्प्यातील कोवीड काळजी केंद्रांचे नियोजन, प्लाझ्मा थेरेपी, लॅबमधील तपासणी यांचा समावेश होता. ते म्हणाले, कोरोनाबाबत पहिली बैठक १२ मार्चला घेतली आणि ग्रामसमिती, प्रभागसमिती स्थापन करण्याबाबत सूचना केली. या समित्यांनी अतिशय चांगलं काम केल आहे. सद्या १९ कोवीड काळजी केंद्र कार्यरत असून या आठवड्यात आणखी १९ कार्यरत होतील. तपासणी नाक्यांवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्त्तीचे संगणकीय यंत्रणेच्या माध्यमातून नोंद घेवून ७ निश्चित केलेल्या पॅरामिटरवर त्याची तपासणी करण्यात येते. याबाबतची माहिती जिल्हा स्तरावरील वॉररूममधून कळते. प्लाझ्मा थेरेपीवर सुरूवातीपासून भर दिला जात आहे. खासगी वैद्यकीय डॉक्टर्स तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. मृत्यू होणार नाही यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे.

लॉकडाऊन बाबत विस्तृत मार्गदर्शिका उद्या शनिवारी (१८ जुलै) जाहीर करण्यात येईल. या सात दिवसांसाठी खरेदी आणि नियोजन करण्यासाठी उद्या शनिवार आणि रविवार हे दोन दिवस नागरिकांना मिळणार आहेत.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून, कोल्हापूर शहर, इचलकरंजी याबरोबरच अनेकत तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. आज सकाळपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत तब्बल कोरोनाचे २०० च्या वरती रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. दिवसेंदिवस कोरोनाचा समूह संसर्ग वाढत असल्याने अखेर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.

Team Lokshahi News