Categories: Featured प्रशासकीय

लॉकडाऊन 4.0 बाबत कोल्हापूर जिल्हादंडाधिकाऱ्यांचा ‘हा’ आदेश; तर देशातील लॉकडाऊन ‘या’ स्वरूपाचा…

कोल्हापूर। कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊन बंदी आदेश दिनांक ३१ मे २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला. कोरोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे. याबाबत नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्तीविरूध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.

सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्यासाठी शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअर्थी राज्य शासनाच्या दिनांक १७ मे च्या आदेशानुसार दिनांक ३१ मे २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यत लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत जिल्हा बंदी आदेश अंमलात राहतील. यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून वेळोवेळी काढण्यात आलेल्या आदेशातील प्रतिबंधीत बाबी तसेच निर्बंधामधून वगळण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक बाबी कायम राहतील.  केंद्र शासनाचे कोरोना बाधित जिल्ह्याचे वर्गीकरण प्राप्त झाल्यानंतर सदरच्या आदेशामध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) याच्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन, शाळा-कॉलेज, मेट्रो-लोकल बंद राहणार

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला (India Lockdown Extension) आहे. देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे देशभरातील लॉकडाऊनमध्ये ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आलीय. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याबाबतची घोषणा केली. लॉकडाऊन ४.० ची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शाळा-कॉलेज बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आता देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन व्यतिरिक्त बफर आणि कंटेन्मेंट झोन असे पाच झोन असणार आहेत.

हेबंदच 

1.. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
2. मेट्रो, लोकल सेवा बंद राहणार
3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
5. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
6. विवाह, सोहळे, सभा-समारंभांवरील बंदी कायम
7. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार

 • कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात पुढील गोष्टींना मर्यादांसह परवानगी
  • होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि कॅटीन सुरु राहणार
  • पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल चालू राहणार
  • सरकारी अधिकारी, अडकलेल्यांसाठी हॉटेल चालू राहणार
  • आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक (दोन्ही राज्यांच्या परवानगीने)
  • राज्याने ठरवलेली जिल्हांतर्गत गाड्या आणि बसने वाहतूक

रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सक्त संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ६५ वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये, असेही या नियमावलीत स्पष्ट केले आहे.

Team Lokshahi News