Categories: Featured

Kolhapur : महापालिका निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ आदेश

कोल्हापूर | कोल्हापूर महापालिका निवडणुकीबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर झाली असून नव्या सदस्यांच्या निवडीसाठी प्रभाग रचना व मतदार यादीचे काम सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विद्यमान सभागृहाची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेले काम आता सुरू होणार असून यामुळे महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार हे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यात नव्या सदस्य निवडीसाठी मतदान होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार यादी व प्रभाग रचनेचे काम मार्च अथवा एप्रिल महिन्यात सुरू होणे आवश्यक होते. मात्र कोरोना संसर्गामुळे हे काम सुरू करणे शक्य झाले नाही. या कामाला किमान सहा ते सात महिन्याचा कालावधी लागत असल्याने निवडणूका वेळेत होणे अशक्य असल्याचे वातावरण निर्माण झाले. त्यातूनच महापालिकेवर काही महिने प्रशासक येणार अशीही चर्चा सुरू झाली.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता संसर्गाची स्थिती पूर्णत आटोक्यात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारी आणि खाजगी कार्यालये देखील सुरू झाली आहेत. जनजीवन देखील पूर्वपदावर येत आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूकीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. यामुळे सध्यातरी मतदार यादी तयार करण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

एकसदस्यीय प्रभाग या पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. महापालिकेत ८१ सदस्य असून त्यामध्ये ४१ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केलेली मतदार यादी तयार आहे. त्यानुसारच प्रभाग रचना करण्यात येणार आहे. हे काम तातडीने सुरू होणार असल्याने निवडणूकीची रणधुमाळी या महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मतदार यादी व प्रभाग रचनेचे काम वेळेत होणार की, त्याला उशिर लागणार यावरच काही दिवसांसाठी प्रशासकाची नियुक्ती होणार की नाही हे अवलंबून राहणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur mahapalika election