कोल्हापूर | मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सकल मराठा समाजाकडून कोल्हापूरातून मुंबई-पुण्याला जाणारे दूध रोखण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी थेट गोकुळ शिरगावमधील गोकुळ दूध संघाच्या दारातच ठिय्या मारून सरकाविरोधात जाेरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास, याचा संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला. मात्र याला न जुमानता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे दिसून आले.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यात टप्याटप्याने आंदोलनाला सुरवात झाली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातून पुणे-मुंबईला जाणारे दूध रोखणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला होता. त्यानुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास आंदोलन कर्त्यांनी थेट गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघावर आपला मोर्चा वळीवला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत आंदोलन कर्त्यांनी गोकुळ दूध संघावर चाल केली. यावेळी त्यांना संघाच्या गेटवरच अडवण्यात आले. त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी गेटवरच ठिय्या मारत, राज्य सरकारचा निषेध केला.
आंदोलकांच्या वतीने पोलीस भरती आणि इतर विभागातीस शासकीय भरती, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका मांडण्यासाठी सरकारला सोमवार पर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला. सरकारने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावे अन्यथा सोमवारपासून वर्षा बंगला, मातोश्री बंगला यासह सर्वच मुंबईकरांना काळा चहा पिण्याची वेळ येईल असा इशाराही देण्यात आला.
यावेळी, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करीत त्यांना ताब्यात घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने जमावबंदी आदेशाचे पालन करीत शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन पोलीसांनी आंदोलकांना केले आहे. पोलीस बंदोबस्तात गोकुळ दूध संघाचे कामकाज पूर्ववत झाले असून दूध पुरवठा सुरू झाला आहे.