कोल्हापूर | मौजमजा करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघा तरूणांनीही केवळ मौजमजेसाठी केलेले ‘धंदे’ पाहून पोलिसही चक्रावून गेलेत. नागेश हणमंत शिंदे (वय २४, रा. गणेशनगर, इचलकरंजी) आणि अविनाश शांताराम कोकाटे (२६, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) अशी या तरूणांची नावे असून मौजमजेसाठी दुचाकी चोरून विकण्याचा धंदाच त्यांनी सुरू केला होता. या सराईत चोरांना अखेर पोलिसांनी अटक केली असून ११ दुचाकीसह त्यांना ताब्यात घेतलयं.
लॉकडाउनच्या काळात नागेश आणि अविनाश हे दोघे तरूण दुचाकी चोरायचे. मौजमजा करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी दुचाकी चोरल्या आहेत. आतापर्यंत ११ दुचाकींची चोरी केल्याची कबुली या दोघांनी चौकशीत दिली आहे. पोलिसांनी चोरीतील सुमारे चार लाख रुपये किंमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या. पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटकेतील संशयितांनी कोल्हापूरसह सीमाभागातही दुचाकींची चोरी केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गुरव यांनी सांगितले.
चोरीच्या दुचाकी कमी किंमतीत विकून मिळालेल्या पैशातून मौजमजा करायची हा गेल्या काही दिवसांपासून या तरूणांनी उद्योग सुरू केला होता. परंतु कोणतीही चोरी फार काळ लपून राहत नाही म्हणतात त्याप्रमाणे या चोरांचीही चोरी फार काळ लपून राहिली नाही. पोलिसांना याचा सुगावा लागल्यावर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.