Categories: गुन्हे सामाजिक

कोल्हापूर महापालिकेने वसूल केलाय तब्बल ३१ लाखांचा दंड; कारण वाचून व्हाल हैराण..

कोल्हापूर | कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय. असे असले तरी कोल्हापूर शहरात येवून नियम न पाळणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. 

शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर तसेच हॅन्डग्लोव्ज न घालणाऱ्या व्यावसायिकांवर केलेल्या कारवाईतून महानगरपालिकेने तब्बल ३१ लाख ३३ हजार ७८५ रुपये दंड वसूल केला आहे. यात केएमटीच्या दोन पथकांनी १३ लाख ३ हजार २८५ रुपये तर महानगरपालिकेच्या तीन पथकांनी १८ लाख ५०० इतका दंड वसूल केल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी पालिका प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना राबवित आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे. यापुढील काळातही विनामास्क फिरणाऱ्यांवर, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच हॅंडग्लोव्हजशिवाय भाजी विकणाऱ्यांसह दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. यासाठी प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाईसाठी विशेष पथके तैनात केली. कारवाईसाठी पोलिस दल आणि केएमटी व महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांची पथके कार्यरत असल्याचे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले.

Team Lokshahi News