Categories: Featured सामाजिक

कोल्हापूरात एनडीआरएफची पथके दाखल..!

कोल्हापूर | जिल्ह्यात मागील वर्षी आलेल्या महापुराच्या अनुषंगाने यंदा संभाव्य पुराची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने जिल्हावासियांच्या मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके पाठवली आहेत. याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली आहे.

राज्य शासनाकडून १५ जुलै पासून ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत ही पथके पुरविण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक नितेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही दोन्ही पथके कार्यरत असणार आहेत. यातील एक पथक शिरोळ तालुक्यासाठी आणि दुसरे पथक कोल्हापूर येथे असणार आहे. प्रत्येक पथकात २२ जवान, २ बोटी, ५० लाईफ जॅकेट, १० लाईफ रिंग उपलब्ध आहेत. या दोन्ही पथकांसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आले असून कोल्हापूर शहरासाठी असणाऱ्या पथकासाठी अग्निशमन अधिकारी चिले, तसेच शिरोळसाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील वर्षी पूर आल्यानंतर वाटप करण्यासाठीचे अनुदान ३१ मार्च रोजी समर्पित केले होते. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे ४१ कोटी निधी प्राप्त झाला होता. हा निधी योग्य त्या लाभार्थ्याला तात्काळ वाटप करण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हीसीद्वारे सर्व तालुका कृषी अधिकारी आणि तहसिलदार यांना दिली आहे.

Team Lokshahi News