कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हातील कोरोनाचा विऴखा अधिकच वाढत चालला असून आज नव्याने ४ रूग्णांची भर पडलीय. यामध्ये आजरा, शाहूवाडी, भुदरगड येथील मुंबईतून आलेल्या तिघांचा समावेश आहे. तर सोलापूरहून आलेल्या सीपीआर मधील एका महिला डॉक्टरलाही कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हातील कोरोनाबाधितांचा आकडा ४० वर गेला आहे. अवघ्या चार दिवसात नव्याने ५० टक्के रूग्ण संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
हे सर्वजण १३ आणि १५ मे रोजी सीपीआरमध्ये दाखल झाले होते. आज सकाळी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. शनिवारी (१६ मे) ७ रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. हे सर्वजण मुंबई आणि सोलापूरहून आले होते. तर आज सापडलेले रूग्ण हे देखील मुंबई आणि सोलापूरहून आलेलेच सापडले आहेत.
सध्या पुणे, मुंबई, सोलापूर आणि इतर जिल्हातून येणाऱ्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाने तयार केलेली यंत्रणा तोकडी पडत असल्याचे बाहेरून येणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. तपासणीसाठी लागलेल्या रांगा, सोशल डिस्टंसिंगचा उडालेला फज्जा आणि आलेल्या प्रवाशांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना क्वारंटाईंन करेपर्यंत त्यांची होणारी हेळसांड या जिल्हा प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.