Categories: Featured

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात निगवे खालसा येथील सुपुत्राला वीरमरण

कोल्हापूर | आज सकाळी जिल्ह्यातील आणखी एका सुपुत्राला पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले. संग्राम शिवाजी पाटील, रा. निगवे खालसा (ता. करवीर) असे शहीद झालेल्या वीरपुत्राचे नाव आहे. ते गेली सतरा वर्षे मराठा बटालियन मध्ये सेवा बजावत होते. ऐन दिवाळीत दोन वीरपुत्र शहीद झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 

देशसेवेसाठी प्रथम प्राधान्य देणारे संग्राम पाटील राजौरी सेक्टर येथे कर्तव्यावर होते. संग्राम पाटील यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. वडीलांनी काबाडकष्ट करून त्यांना शिकवले होते. लहानपणापासून सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी आवश्यक ते कष्ट करून शरीरयष्टी कमावून ते सैन्यात भरती झाले होते. मे महिन्यात सेवा संपवून रिटायर होऊन ते गावी परतणार होते. त्यासाठी ते फेब्रुवारीपासून गावीही परतले नव्हते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. रिटायर झाल्यानंतर गावी संसार करत जीवन जगण्याचे त्यांचे स्वप्न अर्ध्यावरच राहिल्याने सर्वांच्याच मनाला चटका लागला आहे.

काल मध्यरात्रीपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारावेळी संग्राम पाटील शहीद झाले. ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून संग्राम यांच्या अंत्यसंस्कारासाठी चबतूरा बांधण्याचे काम हाती घेतले. गावात मिलटरी फौज व शासकीय अधिकारीही दाखल झाले आहेत.  

ऐन भाऊबीजेच्या दिवशी आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील ऋषिकेश जोंधळे या वीरपुत्राला देखील पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले होते. त्यानंतर करवीर तालुक्यातील संग्राम पाटील यांनाही पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आल्याने जिल्ह्यात पाकिस्तानविरोधी संतापाची लाट पसरली आहे. 

Team Lokshahi News