Categories: अध्यात्म बातम्या राजकीय सामाजिक

कोल्हापूर : जिल्ह्यातील मंदिरे त्वरित खुली करा; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून देशभराता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून सर्वसामान्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. या कालावधीत अनेकांचे व्यवसाय बुडाले, नोकऱ्या गेल्यामुळे परिस्थिती भीषण बनली. यातून सावरण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या पध्दतीने प्रयत्न करत आहेत. 

या सर्व कालावधीत लोकांना मानसिक, आध्यत्मिक स्थैर्य मिळण्यासाठी आवश्यक असणारी मंदिरे देखील बंद ठेवण्यात आली आहेत. एकीकडे कोरोनामुळे लोकांचे राहणीमान, आवडीनिवडी, जीवनजगण्याची पध्दत सर्वकाही बदलले असले तरी देवावरील श्रध्दा मात्र कायम असल्याचेही दिसून आले. त्यामुळे लोकांच्या मानसिक आणि आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी श्रध्दास्थान असलेली मंदिरे पूर्ववत सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी २९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन देखील करण्यात आले होते.

एकीकडे अनलॉकडाऊन ५ च्या पार्श्वभूमीवर सर्व गोष्टी सुरू होत असताना मंदिरे बंद का? त्यामुळे मंदिरे तात्काळ सुरू करावीत अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी ईमेल निवेदनाव्दारे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

निवेदनाव्दारे करण्यात आलेली मागणी –
आत्तापासून मंदिरे सूरू केल्यास दर्शनासाठी वेगळी शिस्त लागण्यास मदत होईल.
मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील सर्व मंदिरे सुरू करावी.

Team Lokshahi News