Categories: Featured

कोल्हापूर : जिल्हा पोलिस अधिक्षकांनी चुकीचे वागणाऱ्या ‘या’ पाच पोलिसांची उतरवली वर्दी; पोलिस दलात खळबळ

कोल्हापूर | जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पोलिस दलातील कामचुकार, बेशिस्त वर्तणुक करणाऱ्यांना मोठा दणका दिला असून पाच जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस दलातील कामात कुचराई, बेशिस्तपणा, गैरवर्तन, निष्काळजीपणासह नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय. यातील तिघा पोलिसांना थेट बडतर्फ करण्यात आल्याने त्यांची वर्दीच उतरली आहे. तर एका महिला पोलिसाला सक्तीने सेवानिवृत्ती आणि एकावर खात्यातून कमी करण्याची कारवाई केली आहे. एकाचवेळी पाच जणांवर झालेल्या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये – पोलिस नाईक – अमित दिलीप सुळगावकर, नारायण पांडुरंग गावडे, महादेव पांडुरंग रेपे (या तिघांना बडतर्फ), समीना दिलावर मुल्ला (सक्तीने सेवानिवृत्ती), आणि पोलिस नाईक संतोष हरी पाटील (खात्यातून कमी) यांचा समावेश आहे. 

  • पोलिस नाईक सुळगावर यांची सध्या पोलिस मुख्यालयात नेमणूक होती. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात असताना त्यांच्याकडे एका महिलेने एक व्यक्ती त्रास देत असल्याचा तक्रार अर्ज दिला होता. त्यांनी तो अर्ज वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला नाही. तो स्वःतजवळ ठेवत संबधित संशयिताशी संपर्क केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
  • गांधीनगर पोलिस ठाण्यात तत्कालिन कर्तव्य बजावणारे पोलिस नाईक नारायण गावडे, महादेव रेपे या दोघांचे बेटींग बुकीशी लागेबंधे असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने तिघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले.
  • राजारामपुरी ठाण्यातील समिना मुल्ला यांची ८ डिसेंबर २०१७ मुख्यालयात बदली झाली. त्यांनी वैद्यकीय रजेवर असल्याचे कळविले; पण त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. मुख्यालयात त्या निवडणूक काळासह इतर वेळीही हजर राहिल्या नाहीत.
  • सांगली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणारे पोलिस नाईक संतोष पाटील सध्या कागल येथे नेमणुकीस होते. ते, सांगलीतून परवानगी न घेता जयसिंगपुरात आले. त्यांचे सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबध नव्हते, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विभागीय चौकशी अंती ते दोषी आढळले.
Team Lokshahi News