Categories: Featured

धक्कादायकः कोल्हापूरात क्वारंटाईन सेंटरमध्ये चक्क ओली पार्टी, दारू मटणावर ताव!

कोल्हापूर |कोल्हापुरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये काही लोकांनी ओली पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिसलेरी बॉटलच्या बॉक्समधून दारुच्या बाटल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून संबंधित व्यक्तींना केवळ तोंडी समज देऊन सोडण्यात आल्याचही स्पष्ट झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांना अनेक ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केलं जातं आहे. अशाच एका क्वारंटाईन सेंटरमध्ये शनिवारी रात्री काही व्यक्तींनी दारुची पार्टी केली. या सर्वांना बिसलेरी बॉटलच्या बॉक्समधून दारुच्या बाटल्या आणि मटण नातेवाईंकडून पोहोचवण्यात आलं. त्यानंतर थाटामाटात या ठिकाणी दारुची पार्टी पार पडली. या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून काही दिवसांपूर्वी आजरा तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रातही असाच प्रकार घडला होता. त्त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात चाललेल्या पार्टी आणि त्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यात आजअखेर 720 रूग्णांपैकी 629 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 106 प्राप्त अहवालापैकी 105 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल नाकारण्यात आला. आजअखेर जिल्ह्यात एकूण 83 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, तर 8 जणांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 74, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 81, गगनबावडा- 6, हातकणंगले- 10, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 66, शाहुवाडी- 179, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 712 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 720 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur-quarantine-center-people-liquor-party-relatives-provide-liquor-bottle