कोल्हापूर | गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे तर कळंबा तलाव देखील ओव्हरफ्लो झाल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान गगनबावडा तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. गगनबावडा तालुक्यात गेल्या चोवीस तासात १०८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुक्यातही इतर तालुक्याच्या तुलनेत जोरदार पाऊस झाला आहे.
राधानगरी धरणाचीही पाणीपातळी वाढल्याने आज दुपारी १२.३० नंतर धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. दोन्ही दरवाजातून प्रत्येकी १४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर बी.ओ.टी. पॉवर हाऊस मधून १४०० क्युसेक असा एकूण ४२५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. सध्या धरणाची पाणापातळी ३४७.५१ फूट इतकी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण विभागासह कोल्हापूर जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.