Categories: आरोग्य सामाजिक

सरकारी यंत्रणेकडील व्हेंटिलेटर खाजगी रूग्णालयांना? संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी

कोल्हापूर | जिल्ह्यात व्हेंटिलेटरची कमतरता असताना सरकारी यंत्रणेकडील व्हेंटिलेटर मात्र खाजगी रूग्णालयांना परस्पर दिली जात असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडने आज निवेदनाव्दारे केला आहे. शिवाजी विद्यापीठातील व्हेंटीलेटरचे प्रकरण ताजे असतानाच खाजगी रूग्णालयांना दिल्या जात असलेल्या व्हेंटीलेटरचा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

काय आहे व्हेंटिलेटरचे प्रकरण 
शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विभागातील कोविड केअर सेंटर मध्ये जुलै महिन्यात प्रशासनाकडून दोन व्हेंटीलेटर देण्यात आले होते. पण आरोग्य विभागाने या दोन्ही व्हेंटीलेटरची जोडणी केलीच नाही. या मुद्द्यावर आक्रमक होत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांना फोन करून हे व्हेंटिलेटर तीन महिन्यांपासून का पडून आहेत? अशी विचारणा केली. यावर आयुक्तांनी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीला रुग्णालयाचा दर्जा नसल्याचे कारण देत व्हेंटिलेटर वापरता येत नसल्याचे सांगितले. 

वरील प्रकरण कोरोना रूग्णांच्या जिवाशी खेळ केल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. संबंधित प्रकरणासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने निवेदनाव्दारे महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी यांच्याकडे केली आहे. 

संभाजी ब्रिगेडने उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

  • रूग्णांचे व्हेंटिलेटर अभावी जीव जात असताना प्रशासनाने दिलेले व्हेंटिलेटर लपवून का ठेवले?
  • शासनाकडून मिळालेले चार व्हेंटिलेटर खाजगी रूग्णालयांना कोणाच्या परवानगीने दिले?

या प्रश्नांसोबतच संभाजी ब्रिगेडने महानगरपालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या सर्व व्हेंटिलेटरची यादी, हे सर्व व्हेंटिलेटर कुठे जोडण्यात आले आहेत याची माहिती, प्रशासनाने खाजगी रूग्णालयांना दिलेल्या व्हेंटिलेटरवरील उपचार घेणाऱ्या रूग्णांची माहिती, प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खाजगी रूग्णालयातील एकूण बेड व तिथे उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या बिलांची माहिती निवेदनाव्दारे आयुक्तांकडे मागितली आहे.

Team Lokshahi News