कोल्हापूर। शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात पाच दिवसांपूर्वी सानिका माळी या विद्यार्थिनीवर विषप्रयोग झाला होता. शिरोळ तालुक्यातील शिरटी येथे पाच दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मंगळवारी सानिकाचा मृत्यू झालाय.
सानिका शिकत असलेल्या शाळेत पाच दिवसांपूर्वी दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा होती. प्रात्यक्षिकानंतर वर्गात आलेल्या सानिकाने आपल्या दप्तरातील बाटलीतून पाणी प्यायलं. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती घरी गेली. सानिकाची प्रकृती खालावल्यामुळे तिला शिरोळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. दरम्यान प्रकृती अधिकच खालावल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.
सानिकाच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत कोणीतरी विषारी औषध टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यूपूर्व जबानीत सानिकाने ही माहिती दिली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी विद्यार्थिनींचा मृतदेह हायस्कूलच्या दारात ठेवला.