Categories: प्रशासकीय सामाजिक

कोल्हापूरात ‘या चार’ ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी; पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते योजनेस प्रारंभ…

कोल्हापूर। महाराष्ट्र शासनाच्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेचा प्रारंभ कोल्हापूरात पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. सुभाष रोड येथील रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंट येथे शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. त्याचबरोबर शहरात इतर ३ ठिकाणी शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी, पालकमंत्री पाटील म्हणाले, केवळ दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना शासनाने आणली आहे. शिवभोजनथाळी या महत्वाकांक्षी योजनेचा आजपासून संपूर्ण राज्यात प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात ५० ठिकाणी प्रारंभ होत आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागातही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू जनतेला अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. स्वस्त दरात, स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना निश्चितपणे उपयुक्त होईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे आदीसह बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या.

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज येथे महापौर वकील सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते, ताराबाई रोड येथील श्री महालक्ष्मी भक्तमंडळ येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते तसेच साईक्स एक्स्टेंशन मधील हॉटेल साईराज येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते आज शिवभोजन थाळी योजनेस प्रारंभ करण्यात आला. या ठिकाणी अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे उपस्थित होत्या.

  1. आण्णा रेस्टॉरंट – सुभाष रोड, (रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित)
  2. हॉटेल शिवाज – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
  3. श्री महालक्ष्मी भक्तमंडळ – ताराबाई रोड
  4. हॉटेल साईराज – साईक्स एक्स्टेंशन
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur shivbhojan thali kolhapur tourism satej patil कोल्हापूर कोल्हापूर टूरिझम कोल्हापूर पर्यटन कोल्हापूर शिवभोजन थाळी ठाकरे सरकार महाराष्ट्र शासन महाविकास आघाडी सरकारच्या योजना शिवथाळी शिवभोजन थाळी शिवभोजन योजना सरकारी योजना