कोल्हापूर | प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून साखर संचालकांच्या अंगावर भिरकावले. कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात हा प्रकार घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गळीत हंगाम२०१७/१८ मधील बिलातील थकित दोनशे रुपये मिळावेत, जबरदस्तीने केलेले ऊस करार रद्द करुन नव्याने करार करावेत, स्वाभिमानीची ऊस परिषद झाल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, थकीत बिले न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत. यासह विविध मागण्या करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (२८ स्पटेंबर) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर आंदोलन केले.
यावेळी, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून त्यांच्या अंगावर भिरकावले. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी सरकार आणि कारखानदार यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला.
दरम्यान, प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांनी कारखान्यांना नोटीसीद्वारे सूचना करण्यात येईल असे आश्वासन दिले. आंदोलनात स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील, युवा आघाडीचे सागर शंभू शेटे, वैभव कांबळे, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.