Categories: आरोग्य

कोल्हापूर: सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ‘त्या’ हॉस्पीटलचा परवाना रद्द करण्याची लोकांकडून मागणी

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावास सर्वसामान्य लोकांचा हलगर्जीपणा जितका कारणीभूत आहे, त्यापेक्षा अधिक हलगर्जीपणा सध्या वैद्यकीय सेवेत काही घटकांमुळे होत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी येथील पहिल्या गल्लीतील प्रसुतीसाठी परिचित असणाऱ्या हॉस्पीटलच्या बाबतीत हा प्रकार घडला असून याठिकाणी प्रस्तुतीसाठी दाखल असलेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे या महिलेवर उपचार करणारे आणि प्रसुतीवेळी संपर्कात आलेल्या लोकांनी क्वारंटाईन होऊन हॉस्पीटलची सेवा इतर वैद्यकीय स्टाफ मार्फत चालु ठेवणे गरजेचे होते. अथवा काही कालावधीसाठी हॉस्पीटलची सेवा खंडित करणे गरजेचे होते. असे असताना संपर्कात आलेल्या वैद्यकीय स्टाफकडूनच सध्या हॉस्पीटलमध्ये सेवा सुरू असल्याचे दिसत आहे. 

सध्या या महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्या वैद्यकीय स्टाफने देखील काही दिवसांसाठी क्वारंटाईन होणे गरजेचे होते. संपर्कात आलेल्या वैद्यकीय स्टाफ मधील लोकांचा पहिला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी हाय रिस्कचा विचार करता किमान दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत क्वारंटाईन होणे गरजेचे होते. सदर हॉस्पीटल ज्यांच्या मालकीचे आहे त्यांच्या कुटूंबातील एक सदस्यच सीपीआर मध्ये कोरोना नियंत्रणासाठीच्या महत्वाच्या जबाबदारीवर कार्यरत आहेत. असे असताना अशा जबाबदार घटकांकडून हलगर्जीपणा होत असेल तर आरोग्यमंत्र्यांनी अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून प्रशासनास योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. 

  • याप्रकरणात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांचे रेकॉर्ड
  • हॉस्पीटलचे ओपीडी रजिस्टर
  • सीसीटीव्ही फुटेज
  • स्टाफचे हालचाल रजिस्टर या बाबी तपासल्यास सत्य सर्वांसमोर येण्यास मदत होणार आहे.
Team Lokshahi News