कोल्हापूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळाना महत्वाचं आवाहन केल आहे. यामध्ये त्यांनी दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता संसर्ग ध्यानात घेत मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. उत्सव साजरा करताना मंडळानी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, मूर्तीची प्रतिष्ठापना शक्यतो मंडळांच्या व तालमींच्या कार्यालयात करावी, तसेच गणेश विसर्जनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे म्हणटले आहे.
आज गणेशोत्सव व मोहरम सण साजरा करण्याबाबत शांतता कमिटीच्या सदस्यांशी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे पालकमंत्र्यांनी संवाद साधला. त्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत विधायक उपक्रम राबवून गणेशोत्सव व मोहरम साजरा केला जाईल, असे आश्वासन यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता कमिटीची ही बैठक झाली. बैठकीस महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.
“दीड दिवसाचा गणपती बसविण्यास प्राधान्य द्यावे. जास्ती गर्दी होणार नाही. आज कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत, हे त्यांच्या कुटुंबावर आलेलं संकट नसून आपल्याच भाऊबंधांवर आलेलं संकट समजावे. घरात एखादी दुर्घटना घडलेली असते, त्यावेळी दीड दिवसाचा गणपती बसवला जातो. त्याच धर्तीवर आपण दीड दिवसाचा गणपती बसवण्यास प्राधान्य द्यावे. पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा”. – दौलत देसाई, जिल्हाधिकारी
“गणेश मूर्ती विसर्जन करिता प्रत्येक वॉर्ड/प्रभाग निहाय शहरात विसर्जन कुंड ठेवण्यात येणार असून, विसर्जना दरम्यान दान करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तींचे कोल्हापूर महानगरपालिकेव्दारे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येईल जेणेकरून जल प्रदूषण रोखण्यास मदत होईल असेही ते म्हणाले”. – आयुक्त कलशेट्टी