Categories: बातम्या शिक्षण/करिअर सामाजिक

‘सह्यगिरी’ च्या कार्याची कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून दखल; सभेमध्ये मांडला अभिनंदनाचा ठराव

कोल्हापूर | सह्यगिरी कला, क्रीडा, साहित्य व शैक्षणिक विचार मंचच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘शैक्षणिक पालकत्व’ उपक्रमाची जिल्हा परिषदेने दखल घेतली असून शिक्षण समितीच्या मासिक सभेत संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ‘सह्यगिरी’ संस्था गेली दहा वर्षे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत आहे. यावर्षी कोरोनामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही बाब ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सह्यगिरी संस्थेमार्फत “शैक्षणिक पालकत्व उपक्रम” हाती घेण्यात आला आहे. 

सह्यगिरीने हाती घेतलेल्या या उपक्रमांतर्गत गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. यासाठी संस्थेमार्फत शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन महिन्यापासून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. वाढदिवस ,शिक्षक दिन, स्मृतिप्रीत्यर्थ या निमित्ताने अनेकांनी  गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून त्यांचे भविष्य घडविण्यासाठी हातभार लावल्याचे यामुळे दिसून आले आहे.

सह्यगिरीच्या या कामाची दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने शिक्षण समितीच्या ७ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या मासिक सभेत संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी सदरचा ठराव मांडला. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव, सदस्य, शिक्षणाधिकारी आशा उबाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 सह्यगिरीचे इतर उपक्रम –

  • मोफत प्रज्ञाशोध वर्ग
  • जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी
  • शिक्षकांसाठी आनंददायी क्रिकेट स्पर्धा
  • दिवाळी सणात “एक पणती माणुसकीची” या उपक्रमाअंतर्गत वंचित घटकांसोबत दीपावली साजरी
  • वंचित घटकांना नवीन कपडे ,फराळ इत्यादी साहित्याचे वाटप
  • कलागुणांना वाव देण्यासाठी महागायक गगनबावडा या संगीत स्पर्धेचे आयोजन
  • सह्यगिरी परिपाठ पुस्तिकेतील प्रार्थना व समूह गीतांसाठी यूट्यूब चॅनल ची निर्मिती
  • पूरग्रस्तांसाठी मदत, जुनी कपडे द्या, आनंद फुलवा, संगीत साधना वर्ग
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur zilha parishad sahygiri